कराड : शेतातील पाचट पेटवताना वाऱ्यामुळे शेजारच्या ऊस पिकाला आग लागली. ती आग विझवण्याच्या प्रयत्नात पाय अडखळून पडल्याने कपड्यांना आग लागून एका शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओगलेवाडी (ता. कराड) येथील हजारमाची परिसरातील मळा वॉर्ड शिवारात बुधवारी सायंकाळी घडली.
जयवंत दिनकर डुबल (वय 65, रा. मळा वॉर्ड, हजारमाची, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डुबल कुटुंबीयांची ओगलेवाडी येथील हजारी माळ शिवारात शेती आहे. काही दिवसांपूर्वी या शेतातील उसाची तोड झाल्याने शेतात साचलेले पाचट काढण्यासाठी जयवंत डुबल बुधवारी सायंकाळी शेतात गेले होते. त्यांनी पाचट पेटवली असता अचानक वाऱ्यामुळे आगीची झळ शेजारच्या उभ्या ऊस पिकाला लागली.
ऊस पेटत असल्याचे लक्षात येताच डुबल यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी त्यांचा पाय अडखळून ते जमिनीवर पडले. याच वेळी त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. वाळलेल्या पाचटामुळे आणि कपड्यांना लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच ते गंभीररीत्या भाजले गेले.
घटना लक्षात येताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. मात्र, तोपर्यंत जयवंत डुबल यांचा होरपळून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.