कोपर्डे हवेली : कराडची शैक्षणिक ओळख असलेली विद्यानगरी सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून येथील पादचारी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत येथे प्रचंड गर्दी होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यानगरी ही ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखली जाते. प्ले-हाऊसपासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व सुविधा येथे उपलब्ध असल्याने राज्यासह बाहेरूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे येतात. त्यामुळे या परिसरात रहिवासी व वाहतूक दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कराड-कोरेगाव हा प्रमुख मार्ग याच भागातून जात असल्याने वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते.
पूर्वी वाढत्या गरजांचा विचार करून कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाटा या दरम्यानचा रस्ता चौपदरी करण्यात आला होता. पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र कालांतराने या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करत हातगाडे, छोटी दुकाने आणि फास्ट फूड स्टॉल उभारले. परिणामी फुटपाथ पूर्णतः नामशेष झाला असून अर्धा रस्ताही व्यापला गेला आहे.
विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यावर उभे राहणारे हातगाडे आणि खाद्यपदार्थ विक्रेते यामुळे वाहतुकीची कोंडी अधिकच वाढते. चारचाकी, दुचाकी, सायकल आणि पादचारी यांची एकाच वेळी होणारी गर्दी परिस्थिती अधिक धोकादायक बनवत आहे. पायी चालतानाही नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत असून यामागे काही गैरप्रकार तर नाहीत ना, अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे.