सातारा

Karad Ganpati Festival : स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या डुबल घराण्याच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

मिरजच्या किल्ल्यात सुरू झालेली परंपरा आजही कराडात कायम

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहरातील अनेक कुटुंबांमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची परंपरा आहे. यामध्ये ऐतिहासिक साळोखे-डुबल घराण्याच्या गणपतीचे विशेष महत्त्व आहे. मंगळवारी या गणपतीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. या परंपरेला केवळ धार्मिक नव्हे, तर ऐतिहासिक संदर्भही लाभला आहे.

कराडच्या साळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा असल्याचे उपलब्ध ऐतिहासिक नोंदींतून दिसते. कराड पेठेचे महाजनपद, देशचौगुले वतन तसेच मिरज किल्ल्याच्या कारभाराशी या घराण्याचा संबंध होता. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सरदार बाळोजी साळोखे-डुबल यांनी मिरज किल्ला व प्रांताच्या कारभाराची जबाबदारी सांभाळली. १७३९ मध्ये मिरज मोगलांच्या ताब्यातून घेतल्यानंतर हा कारभार बाळोजींकडे सोपविण्यात आल्याच्या नोंदी आहेत. घराण्यातील शिदोजी डुबल हे उंब्रजच्या लढाईत धारातीर्थी पडल्याचा उल्लेखही ऐतिहासिक साधनांत आढळतो. त्यांच्या स्मरणार्थ वसंतगडावर समाधी असल्याचे नमूद केले जाते.

पुढील काळात मिरज प्रांतावरील अधिकार बदलले. युद्धजन्य परिस्थितीत डुबल कुटुंबीयांनी मिरज किल्ल्यातील वाड्यातील गणपतीची प्रतिष्ठापना करून दुसऱ्याच दिवशी विसर्जन केले आणि युद्धासाठी किल्ल्याबाहेर पडल्याची घराण्याची परंपरागत माहिती आहे. तेव्हापासून दीड दिवसांचा गणपती बसविण्याची ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जपली जात आहे. त्यामुळे डुबल घराण्याचा गणपती हा कराडच्या धार्मिक परंपरेबरोबरच ऐतिहासिक वारशाचीही आठवण करून देणारा ठरतो. कराड शहरात दीड दिवसाच्या श्रीगणरायाचे भक्तीभावात विसर्जन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT