रेठरे बुद्रुक : सभासदांनी सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाची मोहोर उमटवत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सलग तिसऱ्यांदा चेअरमन पदी एकमताने निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील जे. डी. मोरे यांची सर्वानुमते निवड झाली. निवड जाहीर होताच जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.
कृष्णा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने सर्व २१ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली होती. त्यानंतर बुधवारी कारखाना कार्यस्थळी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत पार पडली.
चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या उमेदवारीला संचालक जगदीश जगताप यांनी सूचक, तर दयानंद पाटील यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. व्हाईस चेअरमनपदासाठी जे. डी. मोरे यांच्या अर्जाला सुनील पाटील सूचक, तर सत्यजित पाटील अनुमोदक होते. त्यानंतर दोघांचीही सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सहायक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने, सर्व संचालक, पदाधिकारी, कराड व वाळवा तालुक्यातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.