कराड : कराड-मलकापूर परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या झोपडपट्टी समस्येवर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाटण कॉलनीतील तब्बल 70 वर्षांहून जुनी झोपडपट्टी, स्टेडियमलगतची झोपडपट्टी, मलकापूरमधील कोल्हाटी समाज, दांगड समाज, तसेच वाखाण परिसर-या सर्व ठिकाणी उभ्या असलेल्या वस्त्यांचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे ठेवण्यात आला असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबांनी सांगितले आहे.
पाटण कॉलनी आरक्षित जागा झोपडपट्टीवासियांना वापरता यावी यासाठी आवश्यक बदल मंजूर करण्यासाठीची फाईल शासनाकडे सादर केली आहे. त्याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतून जवळच्या परिसरात घरे मिळू शकतात का? यासाठीही चाचपणी सुरू आहे. झोपडपट्टीवासीयांच्या नावावर सातबारा हस्तांतरणाचा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार अतुलबाबांनी स्पष्ट केले आहे.
कराडच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा साकारण्यासाठी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याचा मोठा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांना होणार आहे. नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली, तर विविध ठराव, परवानगी आणि विकास योजना तातडीने पुढे सरकतील. तसेच कराडात स्टेडियम परिसराचे सुशोभीकरण आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रूपांतर करण्यावरही भर दिला जाईल. दरम्यान, निवडणुकीत शहराचा सर्वागिण विकास डोळ्यासमोर ठेऊन भाजप मैदानात उतरला असून आम्ही कराडचा चेहरामोहरा बदलण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे आमच्या विचारांच्या उमेदवारांना साथ द्यावी. कराडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनता खंबीरपणे साथ देईल असा विश्वास आमदार अतुलबाबांनी व्यक्त केला.