कराड : कोकण व पश्चिम महाराष्ट्र या राज्यातील दोन प्रमुख विभागांना जोडणार्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारास पाच नवीन बसेस मिळाल्या आहेत. आमदार डॉ. अतुलबाबा व आमदार मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. पाच नवीन बसेस मिळाल्याने कराड तालुक्यातील एसटी सेवा काही प्रमाणात का होईना सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रविवारी सकाळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व आमदार मनोज घोरपडे यांच्यासह माजी आमदार आनंदराव पाटील, हर्षवर्धन मोहिते, पै. धनाजी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पाच एसटी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्रीफळ वाढवून कराड आगारातील समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, अशी ग्वाही आमदार अतुलबाबांनी दिली आहे. कराड तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेवर एसटी सेवा मिळावी, यासाठी कराड आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ना. सरनाईक यांनी पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या उपलब्ध बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांना दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यावसायिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या कराड तालुक्यातील लोकांचा दैनंदिन प्रवास वाढतच आहे. कराड हे केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कृषी, शिक्षण, आरोग्य, साखर उद्योग अशा विविध क्षेत्रांत अग्रगण्य आहे. त्यामुळे बसस्थानकातील प्रवाशांची संख्याही मोठी आहे. सध्या कराड एस.टी. आगारातून दररोज अंदाजे 50 ते 60 हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र आगाराकडे केवळ 50 बसेसच उपलब्ध असून त्या सर्वच जुन्या आणि देखभाल अवस्थेत आहेत.
त्यामुळे अनेकदा बसेस वेळेवर धावत नाहीत. तसेच बर्याचदा ब्रेक डाऊन होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबईत मंत्रालयात ना. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. कराड आगाराला नवीन किमान 30 बसेस उपलब्ध करून देण्याचे निवेदन सादर केले. याच पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात पाच नवीन बसेस मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.