file photo
सातारा

Karad Crime : पोलीस पाटलांच्या पत्नीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

जीवन संपवल्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कराड : झुंजारवाडी (ता. कराड) येथील पोलीस पाटील बाळासाहेब बाजीराव झुंजार यांच्या पत्नी धनश्री (वय ४०) यांचा मृतदेह शुक्रवारी मळी येथील शिवारातील विहिरीत आढळून आला. त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

धनश्री या मंगळवारी (दि. १७) सायंकाळी शेतात खत टाकण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक व ग्रामस्थांनी परिसरातील विविध ठिकाणी तसेच विहिरींमध्ये शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. बुधवारी पती व माहेरच्या नातेवाईकांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.

शुक्रवारी पुन्हा शोध सुरू असताना सायंकाळी चारच्या सुमारास मळी शिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी सहाच्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. रात्री दोनच्या सुमारास शवविच्छेदनानंतर मृतदेह झुंजारवाडी येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, धनश्री यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती बाळासाहेब झुंजार यांच्याविरोधात कराड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी बाळासाहेब झुंजार यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा पुढील तपास कराड पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT