कराड : सुमंगलनगर (गोळेश्वर, ता. कराड) परिसरात बांधकाम सुरू असताना कचरा टाकल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री उडाली. या वादावेळी तलवार, कोयता हातात घेत एकमेकांना मारहाण करण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून दोन्ही गटातील 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गफार अल्लाबक्ष मुल्ला (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमर असलम मोमीन, अरफान फिरोज मोमीन, फिरोज रज्जाक मोमीन, अमानुल्ला रज्जाक मोमीन, आफताब अमानुल्ला मोमीन, असलम रज्जाक मोमीन, समीना मोमीन (सर्व रा. सुमंगलनगर-गोळेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गफार मुल्ला यांच्या घराचे तिसर्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम सुरू असताना तेथील कचरा खाली टाकल्यानंतर तो कचरा फिरोज मोमीन याच्या अंगावर पडला. त्याचा राग मनात धरून फिरोज याचा पुतण्या उमर याच्यासह अन्य संशयीत त्याठिकाणी आले. त्यावेळी उमर याच्या हातात तलवारीसारखे शस्त्र होते. संशयितांनी गफार मुल्ला यांच्या दंडावर तलवारीने वार केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत सुमंगलनगर येथील गफार मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर उमर अस्लम मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्लाबुकस आमीन मुल्ला, इरफान अल्लाबक्ष मुल्ला, गफ्फार अल्लाबक्ष मुल्ला, जुबेर अल्लाबक्ष मुल्ला, इमरान अल्लाबक्ष मुल्ला यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंगावर कचरा का टाकला ? याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणावरून संशयितांनी हातात कोयता घेवून मारहाण केल्याचे उमर मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत उमर मोमीन हे जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.