ढेबेवाडी : पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत भरले नाही. तसेच त्या कर्जापोटी दिलेला धनादेशही वटला नाही. त्यामुळे पतसंस्थेने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात न्यायालयाने कर्जदाराला दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावल्याने खळबळ उडाली आहे. या निकालामुळे पतसंस्थांकडून कर्जे घेऊन परतफेडीस टाळाटाळ करणे, बोगस धनादेश देऊन वेळ मारून नेणे असे प्रकार करणार्या कर्जदारांना जरब बसण्यास मदत होणार आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आणे, ता. कराड येथील जोतिर्लिंग नागरी सह. पतसंस्थेकडून महादेव आबा माने (रा.कोयना वसाहत, ता. कराड) यांनी पतसंस्थेच्या एमआयडीसी तासवडे ता.कराड या शाखेतून 2 लाख 50 हजार तारण कर्ज घेतले होते. कर्जदार हे ग्रामसेवक म्हणून काम करतात. सदरचे कर्जाचे हप्ते त्यांनी वेळेत भरणा न केल्याने ते थकबाकीदार झाले. पतसंस्थेने त्यांना लेखी व तोंडी, तसेच समक्ष भेटून थककर्ज परतफेडीची मागणी केली असता त्यांनी 21 डिसेंबर 2020 रोजी पतसंस्थेस त्यांच्या बँक खात्यावरील एक लाख रुपये रकमेचा धनादेश पतसंस्थेस दिला होता.
त्यांनी पतसंस्थेस धनादेश दिल्यावर पतसंस्थेने तो बँकेत भरला असला तरी त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक न वटता (बाऊंन्स झाल्याने) संस्थेकडे परत आला. त्यानंतर पतसंस्थेने वकिलामार्फत त्यांना तशी नोटीस पाठवली. मात्र, तरी देखील त्यांनी कर्ज रक्कम भरली नाही व परतफेड करण्यात टाळाटाळ केली. वरील प्रकारानंतर पतसंस्थेने त्यांच्याविरुद्ध कराड येथील मे. ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या कोर्टात सेक्शन 138 एनआय अॅक्ट 1881 खाली फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल केला.
सदर दाव्याची सुनावणी होऊन सर्व कागदोपत्री पुरावे, उलटतपास आणि आरोपी व पतसंस्थेचे वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थकबाकीदार महादेव आबा माने यांना दोन वर्षे तुरूंगवास व 80 हजार रुपये दंड अशी शिक्षा ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 न्या. श्रीमती ए. व्ही. मोहिते यांनी ठोठावली. सदर दाव्यासाठी संस्थेच्या वतीने अॅड. एस. व्ही. लोकरे यांनी काम पाहिले. संस्थेच्या वतीने कागदोपत्री पुरावे व अन्य महत्त्वपूर्ण कामी शाखाप्रमुख संजय देशमुख यांनी सहकार्य केले.