कराड : कराड शहरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयिताकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कराड शहर पोलिसांनी ६५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. शुक्रवारी पंकज हॉटेलच्या पाठीमागे ही कारवाई करण्यात आली. दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रशांत प्रदीप जाधव (रा. कराड) आणि संजू भावरसिंग अनारे (रा. धायडी धरणीतांडा, जि. धार, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. सातारा जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची विक्री आणि बाळगणार्या संशयितांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते.
शुक्रवारी पेट्रोलिंगदरम्यान पंकज हॉटेलच्या पाठीमागे एकजण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये ६५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आढळले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शीतल कोल्हाळ यांच्यासह दोन्ही पथकांतील अधिकारी व कर्मचार्यांनी ही कारवाई केली आहे.