चंद्रजीत पाटील
कराड ः निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स संपूर्ण शहरभर लावले आहेत. मात्र, एकाही फलकावर पालिकेची परवानगी असलेला क्यूआर कोड अथवा पालिकेची पावती लावलेली नाही. त्यामुळेच विनापरवाना फ्लेक्स लावत प्रचारावेळी कराडच्या विकासाची वल्गना करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीनंतर पहिल्याच आठवड्यात नगरपालिकेस लाखो रूपयांचा चुना लावल्याचे वास्तव समोर आले आहे.
यापूर्वी तक्रारी अन् तरीही....
कराड शहरातील प्रमुख मार्गासह शहरातील अंतर्गत रस्ते फ्लेक्समुळे अक्षरशः भरून गेले आहेत. मोक्याच्या जागांवर फ्लेक्स लावण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ पहावयास मिळते. नेत्यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स भूषणावह वाटतात, मग ते विनापरवाना असले तरी याचे काहीच देणे - घेणे नसते. यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या नातेवाईकाविरूद्ध अशाच प्रकारावरून तक्रारी झाल्या होत्या आणि त्यानंतरही आजवर यातून कोणीच बोध घेतलेला दिसत नाही.
पालिकेचा ठराव अन् पायमल्ली...
शहरातील शिवतीर्थ, प्रीतिसंगम बाग परिसर आणि कोल्हापूर नाका परिसरात फ्लेक्स लावण्यास मनाई करणारा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर आहे. याशिवाय एक फ्लेक्स लावण्यासाठी दिवसाला 625 रूपये आकारले जातात आणि हे पैसे पालिकेच्या तिजोरीत जातात. त्यामुळेच पालिकेचे मागील आठवड्यापासून किती नुकसान झाले आहे? याचा कराडकरांनीच विचार करणे आवश्यक आहे.
पोलिस चौकीच झाली गायब...
बेकायदा फ्लेक्सकडे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करते. दोन महिन्यापूर्वी तोंडे पाहून पालिका कर्मचाऱ्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्या होत्या. मात्र, नगरपालिका निवडणूक निकालानंतर शहरातील शाहू चौकातील पोलिस चौकीच्या चारी बाजूंना फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याचा खेद ना खंत ना नेत्यांना आहे, ना पोलिसांना. त्यामुळेच शाहू चौकात पोलिस चौकी आठवडाभरापासून गायब झाल्याचे दिसते.
मुख्याधिकाऱ्यांकडून कानावर हात
दोन ते तीन दिवसापूर्वी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना कराड शहरातील फ्लेक्सबाबत माहिती देण्यात आली होती. मुळात त्यांना माहिती देण्याची गरजच नव्हती, प्रशासनाने किंबहुना मुख्याधिकारी यांनी स्वतः बेकायदा व विनापरवाना लावले गेलेले सर्व फ्लेक्स त्वरित काढण्याची सूचना करणे आवश्यक होते. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्याने ही गोष्ट त्यांच्या कानावर घालण्यात आल्यानंतर कारवाई करत शहरातील विनापरवाना लावलेले फ्लेक्स हटविले जातील, अशी अपेक्षा होती. कामाच्या व्यापात मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असेल असे मानले तरी अन्य अधिकारी, कर्मचारी कार्य करतात ? असा प्रश्न निर्माण होतो. सोमवारी दुपारी जैसे थे चित्र पहावयास मिळत होते. यापूर्वी फ्लेक्स वाहन चालक व प्रवाशांच्या अंगावर पडून दुर्घटना घडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच जर अशी दुर्दैवी घटना कराडमध्ये घडल्यास प्रशासन आणि नेते, कार्यकर्ते जागे होणार का ? दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.