पाटण : गुहाघर-विजापूर महामार्गावरील वाजेगाव (ता. पाटण) गावच्या हद्दीत रस्ता वाहून गेल्याने दोन दिवसांपासून बंद असणारी वाहतूक काही प्रमाणात बुधवारी सुरू झाली. केवळ हलक्या स्वरूपाच्या वाहनांना या मार्गावर प्रवेश दिला जात असून अवजड वाहनांची वाहतूक अजूनही बंदच आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावरून अवजड वाहनांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच विजापूर-गुहाघर महामार्गावरील वाजेगाव नजीक अवजड वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे.
मागील दोन दिवसात अतिवृष्टीमुळे पाटण -कोयना या मार्गावरील वाहतूकही ठप्प होती. या दरम्यान संगमनगर-मणेरी-नेरळे या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. सोमवारी मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण मार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल (पर्यायी रस्ता) मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. त्यामुळे प्रशासनाने कराड-चिपळूण महामार्गारील वाहतूक बंद ठेवली आहे. हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी महामार्गाचे प्रशासन भर पावसात प्रयत्न करत होते.
वाजेगावजीक वाहून गेलेल्या पर्यायी रस्त्यानजीक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून सध्या हा पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र याच महामार्गावरील शिरळ या ठिकाणी देखील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी देखील पर्यायी मार्ग करण्यात आला आहे. तेथेही पुढील काळात धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी देखील डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर संबंधित कंपनीने या मार्गावरील धोकादायक ठिकाणी डागडुजीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. जेसीबी आणि पोकलँडच्या साह्याने महामार्गावरील वाजेगाव, शिरळसह अन्य ठिकाणचे रस्ते, भराव तसेच ज्या - ज्या ठिकाणी पावसामुळे धोका, अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणची धोकादायक वळणे, अडचणी काढून प्रशासनाकडून महामार्ग मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
या महामार्गावर अक्षरशः दिवसरात्र संबंधितांकडून काम करून अखेर बुधवारी सकाळी हलक्या वाहनांची चाचणी घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रामुख्याने प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्यासह स्थानिक कोयनानगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी, कर्मचार्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने सार्वत्रिक दिलासा मिळाला आहे.
पाटण तालुक्यातील वाजेगाव पुलावरून वाहतूक सुरू झाली असली तरी मागील दोन दिवसांपासून रस्त्यावर अडकलेली वाहने बाहेर काढली जात आहेत. याशिवाय दुचाकी, छोट्या चारचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आलेली आहे. अद्यापही एसटीसह अन्य अवजड वाहने यांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्या ठिकाणचा पुलाचा भराव व अपेक्षित काम झाल्यानंतरच चाचणी घेऊन मगच मोठ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.