कराड : नवीन शिक्षक भरतीसाठी अनिवार्य केलेल्या ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) ची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रयत्नातील अटकेत असणारा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड हा बेलवाडी (ता. कराड) येथील जय हनुमान करिअर अॅकॅडमीचा सचिव आहे. गायकवाड याच्याशी संबंधित व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सोमवारी मुरगूड पोलिसांनी सोनगे (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे केलेल्या कारवाईनंतर बेलवाडीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एकीकडे मुलांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन करणारा, प्रशिक्षकांच्या माध्यमातून युवकांचे भविष्य घडवणारा म्हणून ओळख असलेला महेश गायकवाड हा सन 2009 पासून या अॅकॅडमीचा सचिव म्हणून कार्यरत होता. त्याला कोणतीही वैयक्तिक राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र, राजकारणातील सक्रिय अस्तित्व आणि भाजप पदाधिकारी म्हणून त्याच्या बंधूची ओळख आहे. पोलिसांनी या टोळीच्या पुढील हालचालींवर लक्ष ठेवत तपास अधिक तपशिलात सुरू केला आहे.
महेश गायकवाड याचे इतर संपर्क, जोडलेल्या व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीही आता वेगाने सुरू झाली असून, या प्रकरणात तालुक्यातील अजून कोणती नवी नावे बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.