सातारा : कराड येथे महिला डॉक्टरांचे अश्लील एआय (तंत्रज्ञानाद्वारे बनवलेले) व्हिडीओ बनवल्याप्रकरणी कथित डॉ. राजेेश शिंदे व पंजाबमधील त्याचा साथीदार या दोघांवर गुन्हा दाखल आहे. यातील पंजाबस्थित विक्रम याने सातार्यातील एकाला धमकावल्याचेही समोर आले आहे. विक्रमसिंह (रा.पंजाब) याने फोन करुन धमकी दिल्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे.
विराज सदाशिव पाटील (वय 32, रा. सदरबझार, सातारा) यांनी दि. 5 मे 2024 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, दि. 3 मे 2024 रोजी अनोळखी मोबाईलवरुन त्यांना फोन आला. ‘विक्रम सिंह, रा.अमृतसर, पंजाब येथून बोलत आहे. मी सीबाआय ऑफिसर आहे. तुझे फॅमिली मॅटर लवकर मिटव. नाहीतर तुला अडचणी येतील,’ अशी धमकी दिली. अनोळखी फोनवरुन आलेल्या याघटनेने तक्रारदार घाबरले. त्यांना मानसिक त्रास झाल्याने दोन दिवसांनी सातारा शहर पोलिस ठाणे गाठले व त्यांनी अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दोन दिवसांपूर्वी कराड येथील महिला डॉक्टरांचे अश्लील एआय व्हिडीओ तयार झाल्याचे सातारा जिल्ह्यात समोर आल्यानंतर सातार्यातील तक्रारदार विराज पाटील यांना त्याची लिंक समजली. यामुळे या टोळीने सातारा जिल्ह्यातील आणखी किती जणांना धमकावले आहे? आणखी कशा पध्दतीने त्रास दिला आहे का? असा सवालही उपस्थित झाला आहे.
दरम्यान, डॉ. राजेश शिंदे याच्या प्रॅक्टिसबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी आहेत. तो डॉक्टर खरच आहे का? असा सवालही उपस्थित झाला आहे. परिसरात तो डॉक्टर असल्याचे सांगत आहे. मात्र वास्तवीक तो केवळ बी.एस्सी असे पदवीचे शिक्षण झालेले आहे. यामुळे या प्रकरणाची सर्व स्तरातून चौकशी होण्याची गरज आहे.
डॉ. राजेश शिंदे याच्यांकडे फक्त बीएस्सी पदवी असल्याचे सांगितले जाते. तरीही तो रूग्णालय थाटून बसला. कोल्हापूरच्या एका पेशंटला त्रास झाल्यानंतर संबंधितांनी रूग्णालयात राडा केला. त्यानंतर हा दवाखाना 21 दिवस बंद होता. मात्र, सातार्यातील एका राजकीय व संघटनात्मक कार्यकर्त्याने सिव्हिल हॉस्पिटलमधील एकाला मॅनेज करून हा दवाखाना पुन्हा सुरू केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पाच लाखाची तोड झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या आशीर्वादानेच या सार्या भानगडी सुरू होत्या का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणाची लिंक संबंधितांसमवेत आहे? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.