बामणोली : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी वीकेंडला कास पुष्प पठार आणि कास तलाव परिसरात पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली. हजारो वाहने व पर्यटकांमुळे संपूर्ण परिसर ओव्हर फ्लो झाला असून, अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि स्थानिक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शनिवार आणि रविवारी सकाळपासूनच कासकडे वाहनांचा ओघ सुरू झाल्याने कास–बामणोली–तेटली–गोगवे मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक पर्यटक तासन्तास कोंडीत अडकून पडले.
कास तलावाच्या सांडव्याजवळ फोटोशूट, सेल्फी आणि मनोरंजनासाठीही मोठी गर्दी होत आहे. मात्र, परिसरात पुरेशा सुरक्षारक्षक, लाईफगार्ड आणि नियंत्रण यंत्रणेचा अभाव असल्याने संभाव्य दुर्घटनांची भीती व्यक्त होत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पर्यटन हंगामात कास, बामणोली, शेंबडी, मुनावळे, तापोळा, भांबवली आणि वजराई धबधबा परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तात्पुरती व कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.