सातारा : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर आता विविधरंगी फुलांच्या रंगोत्सवाला उधाण आले असून पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा नजारा अनुभवण्यासाठी गर्दी करत आहेत. कासवरील कुमदिनी तलाव पावसाने भरला आहे. तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडावेलींनी बहरुन गेले आहे. गेंद, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), गुलाबी तेरडा, सीतेची आसवे, धनगरी फेटा आदी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत.
कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदांसमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढवण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले आहे. सध्या पठारावर विविध रंगी फुलांचा नजारा पठारावर फुलू लागला आहे.
यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे फुलांच्या रंगोत्सवाला लवकर सुरूवात झाली. मात्र, पावसाने सुमारे चार महिने उघडीपच न दिल्यामुळे फुलांच्या बहरण्यावर परिणाम झाला. सध्या पठारावर रिमझिम पाऊस सुरूच आहे. त्यामुळे वातावरण अल्हाददायक असून विविध फुलांचा नजारा विलोभनीय दिसत आहे. हंगामाला नुकतीच सुरूवात झाल्यामुळे पर्यटकांची पावलेही मोठ्या संख्येने पडू लागली आहेत. सुट्टीच्या दिवशी तर पठार पर्यटकांनी हाऊसफुल होत आहे.
पठारावर सध्या गुलाबी तेरडा,सीतेची आसवे, गेंद,धनगरी फेटा, नीलिमा, अबोलीमा, आभाळी, सोनकी ,चवर, टूथब्रश, आमरी, कंदील पुष्प, कुमुदनी यासह विविध रंगी फुले फुले उमलली आहेत. हाच पठाराचा मुख्य बहर असून पठाराच्या हंगामाच्या दुसर्या व अंतिम टप्प्यात पिवळ्या रंगाची मिकी माऊस फुले उमलायला सुरुवात होते आणि पठार पिवळे धमक दिसते. हा नजारा येत्या काही दिवसात पर्यटकांना आणखी भुलवणार आहे.
वायतुरा सातारी तुरा : जगामध्ये दुर्मिळ होत असलेल्या जातीपैकी सातारी तुरा ही वनस्पतींची जात आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागांत ही वनस्पती येते. ही वनस्पती पानामध्ये अन्नसाठा भरपूर साठवत ते. जगात फक्त सातार्याच्या कास पठारावर ही वनस्पती आढळून येत असल्याने तिचे शास्त्रीय नाव सातारान्सीस असे आहे. या फुलांचा बहरही सुरू आहे.