खटाव : आंधळी उपसा सिंचन योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचून पिढ्यान्पिढ्यांचा दुष्काळ तडीपार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडताच जनतेच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळमुक्तीचा दिलेला शब्द पूर्णत्वाला जावू लागल्याने माणदेशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ना. जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत खटाव आणि माण तालुक्यात उरमोडीसह जिहे-कठापूर योजनेचे पाणी आणले आहे. सध्याच्या उन्हाळ्यातील दाहकता कमी करण्यात या दोन्ही योजनांचे पाणी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
माण तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारी आंधळी उपसा सिंचन योजना विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा खोरेच्या अधिकार्यांना यश आले आहे. विधानसभा निवडणुकीपासून या योजनेचे पाणी उत्तर भागाची तहान भागवत आहे. राणंद तलावात ग्रॅव्हिटीने पाणी पोहचवण्यासाठी एका लाईनचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून आंधळी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी राणंद तलावात सोडण्यात आले आहे.
राणंद तलावात जिहे-कठापूर योजनेद्वारे कृष्णेचे पाणी पोहचताच या भागातील जनतेने आनंदोत्सव साजरा केला होता. आता हे पाणी राणंद तलावासह परिसराची तहान भागवणार आहे. पिढ्यानपिढ्यांचा दुष्काळ आणि टंचाई दूर करणार आहे. लवकरच राणंद तलावातील पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माण तालुक्याच्या उत्तर भागासाठी वरदान ठरणारी आणि ना. जयकुमार गोरे यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असणारी आंधळी उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला गेली आहे. जिहे-कठापूर योजनेद्वारे कृष्णेचे पाणी पहिल्यांदाच राणंद तलावात आले आहे. ऐन उन्हाळ्यात आमच्या भागात आलेले आणि यापुढेही कायम येत राहणारे हे पाणी आमच्या जगण्याला आकार देणारे आहे. आमचा बळीराजा आता खर्या अर्थाने दुष्काळावर मात कत्तरून स्वतःच्या शेतात सोने पिकवणार आहे.