सातारा : गरिबांचे आरोग्य मंदिर असलेल्या जिल्हा रुग्णालयात शनिवारी अर्भक मृत्यूप्रकरणी महिला संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी महिलांनी आक्रमक होत रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्या अन्यथा जिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा दिला.
विजापूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. प्रसुती झाल्याने अर्भकाचे वजन केवळ 750 ग्रॅम होते. प्रसुतीनंतर योग्य ती काळजी न घेतल्याने अर्भक दगावले आहे. यासह अर्भक दगावण्याचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात वाढले असल्याचा आरोप करत महिला संघटना आक्रमक झाल्या. शनिवारी दुपारी सीएस जिल्हा रुग्णालयात असल्याची माहिती कळताच जिल्हा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, समाजसेविका सुवर्णा पाटील, सीता चव्हाण, आजरा शिकलगार यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारण्याचे ठरवले. मात्र, दुसरीकडे यावेळी आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती जिल्हा रुग्णालयात आली होती. यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेत समितीसमोरच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराचा पाढा वाचायचा असे ठरवले होते.
मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांनी कक्षातून बाहेर येत त्यांची भेट घेतली. त्यावेळी या महिलांनी सिव्हिलच्या कारभाराचा पाढाच वाचला. त्यातच जिल्हा रुग्णालयात अर्भक मृत्यू होत असून नातेवाईकांचे फोन येत आहेत. आपले डॉक्टर, कर्मचारी हे रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा मोबाईलवर गप्पा किंवा रिल्स बघत बसलेले असतात. विविध विभागाच्या संबंधित डॉक्टरांना कॉल केल्यास ते बाहेर कुठेतरी गेलेले असतात. नक्की कसला कारभार सुरु आहे. शासन लाखो रुपये पगार देत असून काहींना ते कमी पडत आहेत, पैशाची मागणी केली जाते.
डॉक्टर उद्धट वर्तन करतात असा प्रश्नांचा भडीमार महिलांनी केला. रुग्णांना चांगल्या सेवा दिल्या नाहीत याबाबत एकजरी तक्रार आली तर जिल्हा रुग्णालयास टाळे ठोकू, असा इशारा महिलांनी दिला. दरम्यान, रुग्णालयातील कोणत्याही समस्या किंवा रुग्णाबाबत गैरवर्तन झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना दिली.