मसूर : हेळगाव (ता. कराड) येथील सुनंदा सुर्यवंशी यांच्या घराच्या दरवाजाची कडी काढून चोरट्यांनी कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (दि. 20 ) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. दरम्यान, चोरट्यांनी शेजारील बंद घरे फोडत चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी सुनंदा संजय सूर्यवंशी यांनी मसूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 20 ) पहाटे दोनच्या सुमारास हेळगाव येथील कराड कोरेगाव रस्त्यालगत पूर्व बाजूला बसस्थानकाच्या जवळील विरळ लोकवस्तीमधील सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घराच्या किचनचा दरवाजा जोरजोरात आपटत चोरट्यांनी कडी काढली. 30 ते 35 वयोगटातील एकूण चार चोरटे होते. त्यातील दोघे बाहेर थांबले तर दोघे घरात शिरले. त्यामुळे सुनंदा सूर्यवंशी या जाग्या झाल्यामुळे चोरट्यांनी कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देत सुनंदा व त्यांच्या मुलीचे सोन्याचे गंठण, बेडरूममधील लोखंडी कपाटातील दागिने असे सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने घेऊन उसाच्या शेतातून पोबारा केला.
दरम्यान, चोरट्यांनी सुर्यवंशी यांच्या घराच्या बाजूला असणार्या नंदा हणमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे, बाबासो जगन्नाथ पाटील, अर्जुन भिमराव सुर्यवंशी यांची बंद घरे फोडत चोरीचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, एलसीबी सातारा तसेच वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. अधिक तपास सपोनि आदिनाथ खरात करत आहेत.
चोरटे गेल्यानंतर लगेचच सूर्यवंशी यांच्या मुलीने 112 नंबरवर चोरीची माहिती दिली. काही वेळातच घटनास्थळी एलसीबी सातारा, कराड शहर, कराड तालुका, डीबी पथक, उंब्रज, तळबीड, मसूर पोलिस स्टेशनचे पोलिस दाखल झाले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली, परंतु तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते.