सातारा : अजमेर म्हैसूर रेल्वे एक्सप्रेसमधून अज्ञात चोरट्याने साडेचार लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून याप्रकरणी मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर समोर आली आहे.
मुकेशकुमार ओमप्रकाश सारस्वत (वय 47, रा. नागौर, राजस्थान) यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 29 नोव्हेंबर रोजी पहाटे घडली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे कुटुंबियांसोबत लग्न कार्यासाठी इचलकरंजी येथे आले होते. रेल्वेतून प्रवास करत असताना पत्नीकडे असलेली पर्स उघडी दिसली. पत्नीला त्याबाबत विचारणा केली असता पर्समधील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे समोर आले.
चोरट्यांनी पर्समधून 5 तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी, 2 तोळ्याच्या 7 अंगठ्या, नाकातील नथनी, 2 तोळ्याची रुद्राक्ष सोन्याची माळ, मोबाईल फोन असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. दागिने चोरी झाल्याने तक्रारदार यांनी मिरज रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दिली.