Jaykumar Gore | शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे : ना. जयकुमार गोरे 
सातारा

Jaykumar Gore | शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे : ना. जयकुमार गोरे

सोलापुरातील वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय समीकरणांना नवा रंग मिळाला आहे. विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, ही माझी मनापासूनची इच्छा आहे,' असे जाहीर कार्यक्रमात सांगितल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सोलापूर येथील एका कार्यक्रमात ना. गोरे यांनी ना. देसाई यांच्यावर थेट टीका केलेली नसली, तरी विद्यमान पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दुसर्‍या मंत्र्याचे नाव पालकमंत्रिपदासाठी पुढे करणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. विशेषतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचे राजकारण, मतदार प्रतिनिधींची गणिते आणि पॅनेलची मोर्चेबांधणी सुरू असताना हे वक्तव्य झाल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

ना. गोरे यांनी ना. शिवेंद्रराजेंबाबत बोलताना विकासाचा मुद्दा पुढे केला. ‘पालकत्व आम्ही दोघे मिळूनही चालवू. आम्ही दोघे चांगले मित्र असून एकत्र मिळून जिल्ह्यासाठी काम करतो,' असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला एकाच वेळी दोन मंत्री आणि दोघांकडे महत्त्वाची खाती असणे ही मोठी राजकीय ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. २०२५ मधील नियुक्तीनंतर ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लातूर, तर ना. जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले होते.

साताऱ्याची जबाबदारी ना. देसाई यांच्याकडे कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर ना. गोरे यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांनी देसाई यांचे पालकमंत्रिपद बदलण्याची थेट मागणी केलेली नाही. त्यामुळे हे विधान मैत्री, विकासाचा समन्वय आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा संकेत, अशा तिन्ही अंगांनी पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT