म्हसवड : रामायणापासून महाभारतापर्यंत षड्यंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, अशी टीका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता केली.
मार्डी, ता. माण येथील जि. प. गटाच्यावतीने ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, यमाने जीआर काढला आहे. स्मशानभूमीत जायच्या आधीच पाप फेडल्याशिवाय त्याला स्मशानभूमीत घेऊन जाणार नाही, असा जीआर यमाने काढला आहे. जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला. एकही वेळ अशी नाही की मी संघर्ष केला नाही. त्यामुळे परमेश्वराने सर्व गोष्टींवर मार्ग काढून दिला आहे. माण-खटावच्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही, कधी वाकला नाही.
मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता, मी फलटणशी आणि सातार्याशी तडजोड केली असती तर राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र माण-खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभं करू शकलो नसतो. त्यांना पाणी देऊ शकलो नसतो. माझी बाजू सत्याची होती मी संघर्ष केला. सत्याला आयुष्य जास्त असते.
आजपर्यंतचा इतिहास आहे, रामायणापासून महाभारतापर्यंत षड्यंत्र करणारा कधीही जिंकला नाही. शकुनी मामा जिंकला नाही, मग फलटणचा शकुनीसुद्धा जिंकणार नाही. मला संपवता संपवता मी संपलो नाही मात्र त्यांना संपावे लागलं त्यांना घरी बसावं लागलं. त्यामुळेच मी स्वाभिमानाने उभा असल्याचे ना. जयकुमार गोरे म्हणाले.
अनेकांना काळजी आहे अनेकांनी केसमध्ये नाव आहे की नाही माहिती नसताना जामीन घेऊन ठेवले. मात्र जयकुमार गोरे कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता असली किंवा नसली तरीसुद्धा कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देणार नाही, असेही ना. जयकुमार गोरे म्हणाले.