जयकुमार गोरे File Photo
सातारा

Jayakumar Gore : जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना भाजपमुळे गती

मंत्री जयकुमार गोरे : देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम जर कुणी केले असेल, तर ते भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेच केले आहे. वर्षानुवर्षे रखडलेला विकास, थांबलेली कामे आणि जनतेच्या अपेक्षा धुळीस मिळालेल्या होत्या; पण आज चित्र बदलले आहे. आज सातारा विकासाच्या महामार्गावर वेगाने धावत आहे आणि या परिवर्तनाचे शिल्पकार म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप उमेदवारांच्या प्रचारादरम्यान बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‌‘मी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष कामे करून दाखवली. रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकास योजना, ग्रामीण पायाभूत सुविधा, शाळा, आरोग्य केंद्रे या सगळ्या क्षेत्रात आम्ही विकासाची चक्रे फिरवली. साताऱ्याच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे आणि तो आम्ही करून दाखवत आहोत. या जिल्ह्यात वर्षानुवर्षे एका पक्षाची मक्तेदारी होती. सामान्य कार्यकर्त्याचा आवाज दाबला जात होता; पण आम्ही ती मक्तेदारी मोडली. मी जिल्हाध्यक्ष असताना गावोगावी भाजप पोहोचवला, कार्यकर्ता उभा केला आणि सातारा जिल्ह्यात कमळ फुलवले. आज भाजप हा केवळ पक्ष राहिला नाही, तर विकासाचे प्रतीक बनला आहे.

ना. गोरे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची नवी दिशा दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात विकासाचा धडाका लावला. त्याच धोरणांचा थेट फायदा सातारा जिल्ह्याला होत आहे. भाजपाकडे फक्त घोषणा नाहीत, तर स्पष्ट व्हिजन, ठोस धोरण आणि काम करून दाखवण्याची ताकद आहे. काही लोकांना विकास दिसत नाही, कारण त्यांची नजर केवळ राजकारणावर आहे. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही देणंघेणं नाही. पण भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता विकासासाठी झटतो. आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. म्हणूनच आज सातारा जिल्हा बदलतो आहे, पुढे जातो आहे. आज साताऱ्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. हे पर्व अर्धवट सोडायचे नाही. या विकासाच्या रथाला आणखी वेग द्यायचा आहे. त्यासाठी जनतेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे, ताकदीने आणि अभिमानाने उभे राहावे, असे आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT