सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे. म्हणून भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी असेल, शिवेंद्रराजे भोसले असतील, आम्ही सगळे मिळून शेवटपर्यंत प्रयत्न करू. जे काय करायला लागेल ते आम्ही करु, पण झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच असेल, असा पुनरूच्चार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, समन्वयाने महायुतीच्या माध्यमातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे आणि तो निघावा हीच भूमिका घेवून आम्ही काम करत असल्याचेही ते म्हणाले.
सातारा जिल्हा परिषद मैदानावर सरस मानिनी या विभागीय प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ना. जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. झेडपी अध्यक्ष पदाची समीकरणे कशी जुळवणार? या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील निवडणूक महायुतीतल्या पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवली आहे. निवडणूक लढवत असताना शेवटी कोणाची तरी नाराजी असू शकते. कोण दुखावले जाते हे होत राहते. भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. आमची संख्या बघितली तर 28 आहे. तेव्हा भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, ही भूमिका आम्ही पुढे घेवून चाललो आहे. समन्वयाने महायुतीच्या माध्यमातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. अगदीच तो निघाला नाही तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण मिळून शेवटपर्यंत प्रयत्न करु, असेही ना. गोरे म्हणाले.
ना. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्यानंतर एकमेकांबद्दल नाराज असणे साहजिक आहे. निवडणुका लढवत असताना मला माझ्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायला लागेल. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायला लागेल. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना बळ, ताकद देणे ही आपली जबाबदारी आहे. पक्ष वाढवत असताना काही गोष्टी घडतात. एवढं मनाला लावून घ्यायचे काय कारण नाही. शेवटी ते काय आमच्यावर बोलत असतात आम्ही त्यांच्यावर बोलत असतो हे चालू रहात असते. आता निवडणुका संपल्या आहेत. तेव्हा आम्ही सहकारी म्हणून सर्वांनी एकत्र येवून काम केले पाहिजे ही भूमिका आम्ही सर्वजण घेत आहोत. भूमिका ही मीडियांच्या समोर घ्यावयाची नसते. त्या अनुषंगाने चर्चा चालू असतात. चर्चेतून मार्ग निघत असतो. मार्ग निघावा, अशी भावना आहे. मार्ग निघाला नाही तर संगळ्यांना सर्व पर्याय खुले आहेत, असेही ना. जयकुमार गोरे म्हणाले.