Jaykumar Gore 
सातारा

Jaykumar Gore: नादाला लागू नका, टप्प्यात आला की कार्यक्रम करणार

ना. जयकुमार गोरेंचा मकरंदआबांवर हल्ला : कार्यकर्त्यांना ताकद द्यायला येणारच

पुढारी वृत्तसेवा

वाई : सत्तेच्या मस्तीत काही जण मर्यादा विसरले आहेत. पण जनता सर्व पाहत आहे. मी कुणाची जिरवण्यासाठी आलो नसून माझ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलोय आणि येणारच. तुम्ही कोणाच्या पण नादाला लागा, पण आमच्या नादाला लागू नका. आम्ही कोणाच्या मागे लागत नाही; पण आमच्या नादी लागलात तर सोडत नाही. सावज टप्प्यात आलं की कार्यक्रम करणार, असा इशारा ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ना. मकरंद पाटील यांना त्यांच्या होमपिचवर जाऊन दिला.

वाई येथील भाजी मंडईत आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, माजी आमदार मदनदादा भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शशिकांत पिसाळ, डी. एम. बावळेकर, लक्ष्मी कऱ्हाडकर, विराज शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषीकेश धायगुडे पाटील, महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजा शिंदे, जि.प. सदस्य दिलीप बाबर, नगराध्यक्ष अनिल सावंत, पंचायत समिती सदस्या सुरभि भोसले, स्वप्निल गायकवाड, नितीन भरगुडे-पाटील, डॉ. नितीन सावंत, आनंदराव शेळके, अनुप सूर्यवंशी, दिप्ती पिसाळ, अविनाश फरांदे, जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, प्रताप यादव, मंगेश उपाध्ये, सचिन सावंत, जितू पिसाळ, अर्चना यादव, वंदना कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, विराज शिंदे हा माझा कार्यकर्ता असून त्याच्या केसालाही धक्का लागला तर दाखवतोच. लोकांनी बदल म्हणून निवडून दिलं आहे. आता कामगिरीवर पुन्हा निवडून येण्याची वेळ आहे. लोकांसोबत राहा, सेवा करा आणि संधीचं सोनं करा. महायुतीतील समन्वय राखून सर्वांनी जबाबदारीने वागावे. मुख्यमंत्र्यांनी वाईच्या सर्वांगीण विकासाचा दिलेला शब्द पूर्ण करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही ना. गोरे यांनी व्यक्त केला.

मदनदादा भोसले म्हणाले, पाटील कुटुंबाची अवस्था ‌‘एक ना धड, भराभर चिंध्या‌’ अशी झाली आहे. गेली चार-चार वर्षे शेतकऱ्यांना हक्काची साखर नाही, पैसे नाहीत. जर कारखान्याची जबाबदारी पेलता येत नव्हती, तर घेतली कशाला? कवठे केंजळ पाणी योजना रखडली असून ही कधी पूर्णत्वास जाणार? महाबळेश्वर तालुक्यात 10 हजार कोटींचा हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प, वाईतील धरणांवर ‌‘वॉटर प्लेन‌’ सेवा ‌‘नमामी कृष्णामाई‌’ योजनेअंतर्गत कृष्णा नदी व घाट विकास आदी विकासकामे करण्यात येणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.

अनिल सावंत म्हणाले, शंभर दिवसांत दिलेल्या आश्वासनांवर काम सुरू असून शाळांचे सक्षमीकरण, पर्यटन वाढ आणि ट्रॅफिक नियंत्रणाचे प्रकल्प लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. मी मोठ्या घोषणा करणारा नाही, तर काम करणारा कार्यकर्ता आहे. योग्य वेळ आल्यास मोठ्या लढतीसाठीही तयार आहे. माझ्या शरीरयष्टीवर जाऊ नका, मी कुणालाही घाबरत नाही. अर्ध्या रात्रीलाही फोन करा; शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT