सातारा : महायुतीमध्ये घटकपक्ष म्हणून एकत्र असतानाही सत्तेचा आणि पदाचा अहंकार डोक्यात गेल्याने ना. जयकुमार गोरेंनी कधीही मित्रपक्षांचा विचार केला नाही. घटकपक्षांना विश्वासात घेण्याऐवजी त्यांना दुय्यम वागणूक देत स्वतःच्या राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले. जिल्हा परिषदेत राबवलेल्या हुकुमशाही पध्दतीविरोधात आता जिल्हा बँकेच्या निवडीत महायुतीतील घटकपक्षांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
सत्ता व पदामुळे जयकुमार गोरेंना आलेला अहंकार, आडमुठेपणा आणि घटकपक्षांना गृहीत धरण्याची वृत्ती यामुळेच भाजपला जिल्हा बँकेत जास्त संचालक असतानाही सत्तेबाहेर राहावे लागले आहे. महायुती म्हणून एकत्र असताना यापुढे जिल्ह्यात त्यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखरभाऊ गोरे यांनी दिला आहे.
शेखर गोरे म्हणाले, महायुतीमध्ये सर्व घटकपक्षांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित असताना जयकुमार गोरेंनी मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थापलीकडे कधीच विचार केला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी घटकपक्षांना विश्वासात न घेता भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी सत्तेचा आणि प्रशासनाचा कसा वापर झाला, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. त्यावेळी घटकपक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी केवळ राजकीय मतभेद नव्हते तर मित्रपक्षांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याच्या वृत्तीविरोधातील संताप होता. त्याच नाराजीचा परिणाम आता जिल्हा बँकेच्या निवडीत दिसून आला आहे. राजकारणात मित्रपक्षांना विश्वासात घेणे, त्यांचा सन्मान राखणे आणि समन्वयाने निर्णय घेणे आवश्यक असते. मात्र, अहंकार आणि आडमुठ्या भूमिकेमुळे भाजपला आज जिल्हा बँकेत सत्तेबाहेर बसण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेखर गोरे म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक आपण यावेळी लढवणार नव्हतो. जयकुमार गोरेंनी आम्ही दोघे भाऊ एकत्रच असल्याचे सांगत सत्ता, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून सोसायट्यांचे ठराव करून घेतले. शेवटच्या टप्प्यात केवळ निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी आपण उमेदवारी अर्ज कायम ठेवला. अन्यथा ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तर आज आपणही जिल्हा बँकेत असतो.
जयकुमार गोरेंच्या अहंकारी आणि एकाधिकारशाहीच्या कार्यपद्धतीचा परिणाम केवळ महायुतीतील घटकपक्षांवरच झाला नसून भाजपमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्वतःच्या निर्णयांनाच अंतिम समजून इतरांना दुय्यम ठरवण्याची वृत्ती पक्षासाठीही घातक ठरू शकते. त्यांच्या या वागण्यामुळे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील भाजपात अंतर्गत नाराजी असल्याचेही शेखर गोरे यांनी म्हटले आहे. शेखर गोरे म्हणाले, आज मतदारसंघात एकही विरोधक शिल्लक ठेवायचा नाही, अशा पद्धतीने राजकारण सुरू आहे. आपल्याकडे न येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याची भीती दाखवणे, खोट्या-नाट्या प्रकरणांत अडकविण्याचे प्रयत्न करणे, कोणत्या प्रकरणात अडकवता येईल याचा शोध घेणे, असे प्रकार सुरू आहेत. यापुढे त्यांची ही सत्तेची व पदाची मस्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.