सातारा : मी महाराजांना सर्व अधिकार बहाल केले आहेत. त्यांच्या वयाच्या हिशोबाने व त्यांना या वयात त्रास होवू नये, अशी व्यवस्था केली आहे. त्याची त्यांना अडचण नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला.
ना. जयकुमार गोरेंना देवाने सद्बुध्दी द्यावी, मी माझ्या तोंडाला सेन्सारशिप लावली आहे ती योग्यवेळी माघारी घेईल, असे वक्तव्य आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यक्रमात केले होते. त्यानंतर शुक्रवारी सातारा येथे पत्रकारांंशी संवाद साधताना ना. जयकुमार गोरे यांनी आ. रामराजेंना प्रत्युत्तर दिले. मंत्रीमंडळ फेरबदलाच्या संजय राऊत यांच्या भाकिताबद्दल विचारले असता भाकितानंतर काय ते राऊत यांनाच विचारा, असे ना. गोरे म्हणाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी अयोग्य कागदपत्रे सादर केल्याचा अहवाल आला आहे या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, शिक्षक बदली हा विषय राज्यव्यापी आहे. संवर्ग 1 मध्ये समावेश व्हावा आणि बदलीपासून संरक्षण मिळावे अशा पध्दतीने काही शिक्षकांनी प्रयत्न केले आहेत. त्यातून बनावट दिव्यांग, आजाराचे दाखले, नवराबायकोसोबत राहत असताना कागदोपत्री घटस्फोट घेतले, फलटण तालुक्यात 14 ते 15 अशा प्रकारचे घटस्फोट होते, अशा वेळी एखादा लाभ घेण्यासाठी चुकीचे सर्टीफिकेट तयार करणे, चुकीचे दाखले मिळवणे हे दाखल्याचे रॅकेट आहे. यामध्ये ते दोषी नसले तरी त्यांना दिले आहेत ते दोषी आहेत. त्यासदंर्भात चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना राज्यातील सर्व सिईओंना दिल्या आहेत. त्याची चौकशी चालू आहे. सातारा जिल्ह्याने त्यामध्ये खूप पुढे जावून काम केले आहे. योग्य दिशेने त्यामध्ये काम चालू आहे.
राज्यात महायुती कुठेही एकत्र लढणार नसल्याचे बोलले जात आहे. या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, शेवटी स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बर्याच गोष्टी अवंलबून राहतात. जर पक्षपातळीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अमंलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे. पण असं जरी असलं तरी सुध्दा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे. एखादा लढूच शकत नाही असे काही मतदारसंघ व तालुके आहेत. त्यासंदर्भात त्या-त्या ठिकाणी वरिष्ठ निर्णय घेतील. जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आणि जो निर्णय खाली घेणे आवश्यक आहे. त्या-त्या ठिकाणी वेगळे निर्णय होतील.
जलजीवनची बिले प्रलंबीत असल्याने सांगली जिल्ह्यात युवा ठेकेदाराने आत्महत्या केली आहे, या प्रश्नावर बोलताना ना.जयकुमार गोरे म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर ते होते का? त्यांच्या नावावर काम होते का? वर्कऑर्डर त्यांच्या नावे आहे का? त्याअनुषंगाने त्यांनी काम केले आहे का? या सर्व गोष्टी तपासायची आवश्यकता आहे. तपासल्यानंतर त्या गोष्टीवर बोलणे योग्य राहिल. मात्र आमच्या विभागापुरते बोलायचे म्हटल्यास तशी परिस्थिती ग्रामविकास विभागामध्ये नाही. राज्याची परिस्थिती माझ्याकडे माहिती नसल्यामुळे मी माहिती देवू शकत नाही. मात्र ग्रामविकास खात्यामध्ये ज्यांची ज्यांची कामे झाली आहेत त्यांना बिले दिली जात आहेत.
महामंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेखर गोरेंना शब्द दिला होता या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, कुणाला काय शब्द दिला, दिलेला शब्द त्यांना माहिती, ज्यांनी घेतला त्यांना माहिती, यासंदर्भातील मला माहिती नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे उचित नाही.
घरकुलासंदर्भात बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, महाराष्ट्राला न भुतो न भविष्यती असे घरकुलाचे टार्गेट मिळाले होते. 10 वर्षापूर्वी सुमारे साडेतेरा लाख घरकुले राज्याला मिळाली होती आणि या सहा महिन्यात 30 लाख घरकुले राज्याला मिळाली आहेत. संपूर्ण देशात कुठल्या राज्याला एवढी घरकुले मिळाली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी मिळालेल्या घरकुलांना युध्दपातळीवर मान्यता देण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. घरकुलांची कामे वेगाने सुरू आहेत. साडेचार महिन्याच्या कालावधीत सव्वालाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. दुसर्या फेजमधील घरकुलांच्या मान्यता अंतिम टप्प्यात आहेत. सव्वा वर्षात सुमारे 30 लाख घरकुलांचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.