सातारा

Satara Soldier: पवारवाडीचे जवान तुषार भिलारे अनंतात विलीन

पवारवाडी, ता. जावली येथील सुपुत्र जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) यांचा झाडावरुन पडून झालेल्या अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

सायगाव : पवारवाडी, ता. जावली येथील सुपुत्र जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) यांचा झाडावरुन पडून झालेल्या अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बुधवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी ‘अमर रहे अमर रहे... तुषार भिलारे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर शोकसागरात बुडाला होता.

याप्रसंगी तहसीलदार प्रवीण मुदगल, मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, आर्मीचे अधिकारी, जवान, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी, सातारा पोलीस दल,मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ उपस्‍थित होते.

जवान तुषार भिलारे हे आर्मीमध्ये महू (मध्यप्रदेश) येथे कार्यरत होते. सुट्टीवर आले असताना झाडावरुन पडून त्यांचा अपघात झाला. त्यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्‍यांचे निधन झाले. निधनाची बातमी समजताच पवारवाडी गावात शोककळा पसरली होती. गावकरी पार्थिवाची वाट पाहत होते. बुधवारी पार्थिव आल्यानंतर आनेवाडीपासून सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी वाटेवरील प्रत्येक गावात ‘अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते.

अंत्ययात्रा पवारवाडी येथे पोहोचताच जवान तुषार भिलारे यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. त्यानंतर झालेल्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. स्मशानभूमीत आर्मी, पोलीस दल, प्रशासन व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मानवंदना देवून बंदुकीच्या तीन फैरी करण्यात आल्या. यावेळी आई, वडील, पत्नी, दोन मुली व कुटुंबियांना शोक अनावर झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT