शशिकांत शिंदे, शिवेंद्रराजे भोसले 
सातारा

Satara Politics : जावलीत ११० टक्के संघर्षाची तयारी

शिवेंद्रराजेंचे शिंदेंना थेट आव्हान : कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर येणारच

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जावली तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘मला संघर्ष नवीन नाही. मी संघर्षातून उभा राहिलो आहे. इथून पुढेही संघर्ष करण्याची आमची ११० टक्के तयारी आहे. त्यांच्याकडून दहशत-दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असेल, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. कार्यकर्त्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू.’ असा थेट इशारा ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खा. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावलीतील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा बँकेचे ठराव लोकशाही पद्धतीने व्हावेत, यासाठी आपण सुरुवातीपासून आग्रही होतो. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांकडून जावळीचे वातावरण विनाकारण तंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिवेंद्रराजेंनी केला. ‘आर्डे, वरोशी गावातील सोसायटीच्या सदस्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न शशिकांत शिंदे यांच्या लोकांनी केला; तो आम्ही हाणून पाडला. हुमगावातून येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला,’ असा दावा त्यांनी केला. गावागावांत सहकार विभागाकडे ठराव सादर करण्यासाठी प्रत्येक गावाला स्वायत्तता मिळावी, अशी आपली भूमिका असल्याचेही ना. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले. ‘ज्या गटाची मेजॉरिटी असेल, त्याचा ठराव झाला पाहिजे. लोकशाहीचे हे वातावरण विरोधकांना मान्य नसेल आणि दहशत-दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असेल, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा, हे अद्याप ठरलेले नसल्याचे शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले. अंतिम यादी निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याने त्यावेळी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

जशास तसे उत्तर देऊ

जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेची ठराव प्रक्रिया लोकशाही पद्धतीने सुरू असताना आर्डे, वरोशी, आखाडे गावांमध्‍ये माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्‍या लोकांनी धाकधकटशाही केली. जे कार्यकर्ते माझ्‍यासोबत काम करतात, त्‍यांच्‍यासोबत राहण्‍याची माझी भूमिका आहे. शेजारचे गाव हुमगाव हे मोठं असल्‍याने दादागिरी होणार असेल तर रस्‍त्‍यावर उतरण्‍याची मी भूमिका घेणार. ज्‍या मुलाच्‍या आईचा ठराव झाला, तिच्‍या मुलाला मारहाण करण्‍यात आली. कोण दहशत करतंय हे यानिमित्ताने समोर आले आहे. बोलणे वेगळे आणि वस्‍तुस्‍थिती वेगळी आहे. शिंदे यांच्‍या धाकधकटशाहीला जशास तसे उत्तर देण्‍याची आमची तयारी आहे, कार्यकर्त्यांना मारहाण होणार असेल तर आम्‍ही संघर्ष करण्‍याची तयारी आम्‍ही ठेवली आहे, असे खडेबोल ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी शिंदे यांना सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT