पाचगणी : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने पाचगणी व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्ट्रॉबेरी शेतीलाही मोठा फटका बसला आहे. शेतातील स्ट्रॉबेरीची झाडे पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याचबरोबर वाटाणा व बटाट्याचेही नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिल्याने शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे. सततच्या पावसामुळे कडाक्याची थंडी व दाट धुक्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नेहमी कमी पावसाच्या ठिकाणी मदर प्लांटची निर्मिती केली जाते. मात्र, या भागातही पावसाचा जोर वाढल्याने स्ट्रॉबेरीची रोपे पाण्यात गेल्याचे चित्र आहे. विशेषतः स्ट्रॉबेरी, बटाटा व वाटाणा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओल्या हवामानामुळे बटाट्यावर करपा रोग, पिकांची गळ व रोगराई वाढण्याची शक्यता आहे. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकर्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती आहे.
पाचगणी, आंब्रळ, राजपुरी, खिंगर, भिलार, भोसे, पांगारी, दानवली आदी भागांसह तालुक्यात तब्बल दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. परदेशी रोपे मागवून त्यावर प्रक्रिया करून मदर प्लांटद्वारे लाखो रुपयांची निर्मिती केली जाते. या उद्योगावरच स्थानिक शेतकर्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने सध्या पाऊस चिंताजनक आहे.
मेढा : जावली तालुक्यात पावसाने दमदार बॅटींग केली आहे. तालुक्यात मेढा, केळघर, कास, बामणोली, कुडाळ,भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, नदी काठच्या विहिरी पाण्यात बुडल्या आहेत. कण्हेर धरणाच्या पातळीत वाढ होत असून वेण्णा नदी तुडूंब भरली आहे. मेढा मोहाट पुलाजवळील नदीपात्राबाहेर असणार्या वीट भट्ट्यांनी जलसमाधी घेतली आहे.
सोमवारपासून जावलीत पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठा असणार्या मेढा, कुडाळ, केळघर, करहर, बामणोली ओस पडू लागल्या आहेत. या पावसाने ओढे, नाले, नद्या जोरदार पावसाने दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. वेण्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. केळघर बामणोली या अन्य ठिकाणच्या घाटात छोटे-मोठे दगड रस्त्यावर आले. अनेक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यातील मोरावळे, मेढा, केळघर, मामुर्डी, आंबेघर, नांदगणे, गवडी, वरोशी, रेंगडी या गावातील रस्त्यालगत नाले नसल्यामुळे शेतात पाणी घुसले आहे.