देवापूर : कुकुडवाड गटात कोणाला पण आणावं, नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जिल्हा परिषदेला उभं राहावं, मी आहेच. आता दुसरा, तिसरा कोणी नाही तर जयकुमार गोरे यांच्याबरोबर लढायचंय. अभयसिंह जगताप, आम्ही दोघे मिळून ताकदीने निवडणूक लढणार आहे, असे ठाम मत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे कुकुडवाड गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप, सरपंच विलास खरात, विक्रम शिंगाडे, अरुण सावंत, तानाजी काटकर, भारत अनुसे, दत्तात्रय सोनवणे, महेंद्र देसाई, जालिंदर खरात, विश्वनाथ नलवडे उपस्थित होते.
अनिल देसाई म्हणाले, कुकडवाड गटात बाहेरचा दुसरा, तिसरा कोणी पाठवूच नका. एकदा लढाई करायची असेल तर खऱ्या जयकुमार गोरेंनी निवडणुकीच्या मैदानांत उतरावं. नुसत्या नावाच्या गोरे यांना इथे पाठवू नये. मग एकदा कुणाकडे काय आहे, कुणाकडे किती डेअरिंग आहे, हे एकदा लोकांना बघूद्यात. आज त्यांच्याकडे मंत्रिपद आहे, त्यामुळे हिम्मत असेल तर तशी निवडणूक एकदा करावी, तशी आमची तयारी आहे. यावेळी डी. एल. बाबर, सदाशिव वनगर, बंडू नरळे, धनाजी शिंदे, किरण बाबर, देवानंद जगताप, हरिश्चंद्र आटपाडकर, मधुकर जेडगे उपस्थित होते. आभार संजय जगताप यांनी आभार मानले.