फलटण : लबाडीच्या पायावर उभे असलेले राजकारण फार काळ टिकत नाही. जंगलात वाघ येतो, तेव्हा लांडगे अस्तित्वासाठी कळप करतात. उद्या कोणीही आघाडी करूद्या, कोणी कुठेही जाऊद्या. संघटन मोठी होत असते. सुकाळ आला की इच्छुकांची संख्या वाढते. फलटणमध्ये कोणीही येऊद्या. कोणताही पालकमंत्री येऊद्या. पण मी ठामपणे सांगतो की, फलटणचे खरे पालकमंत्री रणजितसिंह निंबाळकरच आहेत. त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व राज्याचे संपूर्ण सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
फलटण येथील सजाई गार्डन येथील आयोजित विजय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, बापूराव शिंदे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्र आघाडी भाजपविरोधात आकार घेत आहे. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीच मंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात एकत्र लढाई करण्याचे संकेत मिळाले. त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटणमध्ये जावून या आघाडीविरोधात तोफ डागली.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, मी फलटणला आलो की काही लोक घाटावरचा आलाय म्हणून माझी हेटाळणी करायचे. परंतु काळाचा महिमा आगाध आहे. आज फलटणच्या प्रथम नागरिकाने माझे स्वागत केले आहे. माझी हेटाळणी करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. खऱ्या अर्थाने फलटणच्या राजकीय परिवर्तनाची सुरुवात आ. सचिन पाटील यांच्या विजयाने झाली होती. फलटण नगरपालिकेवर नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर यांच्या विजयाने राजकीय परिवर्तनाचा शिक्का मजबूत झाला आहे.
नगरपालिकेतील पराभवाने विरोधकांच्या राजकीय अस्ताची खरी सुरुवात झाली आहे. पराभवाने इथले प्रस्थापित सैरभैर झाले आहेत. त्यातूनच जिल्ह्यातील काही नेते आघाडी करण्याचे सूतोवाच करत आहेत. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील महानगरपालिकांचे निकाल ज्यांनी पाहिले आहेत ते अशी युती करण्याचे धाडस करतील, असे मला वाटत नाही.