सातारा : सातार्यातील आयटी पार्कचा प्रश्न मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे. या संदर्भात शुक्रवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सातार्यात लिंब खिंडीत आयटी पार्क उभारण्याचा निर्णय झाला. दरम्यान, या निर्णयामुळे दोन्ही राजेंचे प्रयत्न फलदायी ठरले असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ना. उदय सामंत शुक्रवारी सातारा दौर्यावर होते. त्यांनी प्रारंभी दोन्ही राजेंची त्यांच्या जलमंदिर व सुरूचि या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने तसेच सातार्यातील आयटी पार्क उभारण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ना. सामंत म्हणाले, सातार्यात एमआयडीसीचे विभागीय कार्यालय असावे, अशी उद्योजकांची मागणी होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्यासाठी या कार्यालयास मंजुरी दिली होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे.
आयटी पार्कबाबत मंत्री ना. उदय सामंत म्हणाले, सातार्यात आयटी पार्क व्हावे यासाठी दोन्ही राजेंसोबत चर्चा झाली आहे. दोन्ही जागेंचा सर्व्हे करण्यात आला आहे. म्हसवडच्या 3 हजार एकरमध्ये कॉरिडॉर होत असून त्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. इथल्या संघटनांशीही चर्चा करुन अडीअडचणी सोडवल्या जातील.
ना. उदय सामंत म्हणाले, पूर्वीचे शेतकरी तसेच उद्योजकांचा पाण्याचा कोटा कमी होणार नाही. एमआयडीसी आल्यावर पाण्याचा कोटा वाढवला जाईल. पूर्वीचे नागरी वस्तीसह शेती व उद्योगांना त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.महापुरूषांची बदनामी केली जात असताना त्याबाबत कायदा व्हावा अशी खा. उदयनराजेंची मागणी आहे, याबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान देशात सहन केला जाणार नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणार्या प्रवृत्तींना थारा देणार नाही. याबाबत कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.
मुंबईमध्ये मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाबाबत ना. उदय सामंत म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे लोक रहात असून त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल कुणी वेडंवाकडं काही करत असेल तर त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशात पोलिस विभागाशी पंधरा दिवसांत बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ बोर्ड विधेयकाबाबत ना. उदय सामंत म्हणाले, या विधेयकाबाबत दोन्ही बाजू बघितल्या. हिंदुत्व जोपासले म्हणून सांगणार्यांनी काय केले हे जनतेने पाहिले आहे. काँग्रेसच्या मांडीवर कोण जाऊन बसले हे लोकांनी पाहिले आहे, अशी टीका त्यांनी केली.