लिंब : सातारा तालुक्यातील लिंबखिंड (नागेवाडी) येथे महामार्गालगत शासकीय जागेत राज्य शासनाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने एमआयडीसी विभाग आणि उद्योग विभागाच्या वतीने शुक्रवारपासून ड्रोन सर्वेक्षणच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सातारा आयटीपार्कचे लवकरच नोटिफिकेशन निघेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, शासनाची जी जागा आहे ती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्कचे नोटिफिकेशन होईल. त्याद़ृष्टीने माझ्याकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या आयटी पार्कबरोबर यामध्ये कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा करण्यात येणार आहे. सातारकरांनासुद्धा या कन्व्हेन्शन सेंटरचा मोठा फायदा होणार आहे. लिंबखिंड बरोबरच गोडोली येथील वळू केंद्र या ठिकाणच्या जागेबाबत शासनाकडे प्रस्ताव दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री ना. उदय सामंत त्यांच्याकडे माझा फॉलोअप सुरू आहे. सध्या या लिंबखिंड परिसरातील क्षेत्राचा सर्व्हे झाल्यानंतर नोटिफिकेशन निघणार व त्यानंतर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू होईल. त्यानंतर रस्ते, पाणी हे सर्व झाल्यानंतर उद्योजक आपल्याकडे येतील.
आमचे येथे काहीतरी आयटी सेक्टर इंडस्ट्रीजची सुरुवात झाली आहे, असा चांगला संदेश आयटी क्षेत्राशी संबंधित असलेल्या उद्योजकांकडे जाईल, जेणेकरून सातारकडे हे उद्योजक वळतील. यावेळी एमआयडीसी विभागाचे उप अभियंता लहू कसबे, अक्षय गरुड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. याशिवाय या प्रस्तावित आयटी पार्क जागेचा सर्व्हे इन्फो टेक, कोल्हापूर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
सातारा परिसरातील युवकांना आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी सातारा सोडून बाहेर जावे लागत असल्याची अनेक दिवसांची खंत होती. सातारच्या या आयटी पार्कमध्ये पुण्या-मुंबईसह बाहेरच्या कंपन्या आल्या की लोकांना रोजगार मिळणार आहे.- ना. शिवेंद्रराजे भोसले