चाफळ; पुढारी वृत्तसेवा : सध्या लग्नाकरता सर्वत्र मुली पाहण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मात्र आता मुलींकडून भूमिहीन, शेतमजूर, शेतकरी मुलांना नापसंती मिळत आहे. मुलाकडे शेती पाहिजे, मात्र मुलगा शेतकरी नको आहे. परिणामी मुलांच्या पालकांकडून फक्त मुलगी द्या लग्न आम्हीच करू अशी विनवणी केली जात आहे. हे बोलके चित्र शहरी व ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे.
पुरुषप्रधान समाजात उपवाराचे पूर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुलीं मिळणे कठीण झाले आहे. पूर्वी मुलांच्या शोधासाठी मुलींचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिनो महिने नातेवाईकांच्या घरी फिरायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वन वन भटकत आहेत. निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी. सध्या ग्रामीण भागातील मुलींच्या पित्यांची नजर शहरी भागातील मुलांकडे वळली आहे. श्रीमंत असो की गरीब असो, शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीसह तिचे पालक नकार देत आहेत. त्यामुळे प्रेम प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाह इच्छुक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.
पूर्वी मुलांचे लग्न लाखो रुपयांची उधळण करून मोठ्या थाटामाटात करत होते. मात्र शेतीच्या कर्जामुळे अल्पखर्चातच लग्न साध्या पद्धतीने केले जात आहे. मुलगी मिळने कठीण झाल्यामुळे बर्याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून लग्न जोडून देणार्यांना चांगले दिवस आले आहेत. शेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार होत नाहीत. मुलींकडून सर्वात प्रथम सरकारी नोकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु काही ठिकाणी सध्या नोकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहे. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच अशी मागणीचा जोर आहे.
अनेक गावांत तरुण लग्न करण्याकरता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांचे वय 35 वर्षांहून अधिक झाले आहे. काही ठिकाणी तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आम्ही द्यायला तयार आहोत, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करू, फक्त मुलगी द्या, असा निर्णय तरुण घेत आहेत.