सातारा : सातारा -जावली मतदारसंघातील कोयना प्रकल्प विभागाच्या स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना करणे, उरमोडी पाटबंधारे प्रकल्प, आंबळे धरण, लावंघर, वेणेखोल पुनर्वसन, नियोजित बोंडारवाडी प्रकल्प, कुडाळी मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचे प्रलंबित प्रश्न तसेच पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ना. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, राम सातपुते, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, शिवरुपराजे खर्डेकर, एमकेव्हीडीसी संचालक माणिकराव सोनवलकर, प्रधान सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता गुणाले यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कोयना प्रकल्प विभागाच्या स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना करणे. उरमोडी पाटबंधारे प्रकल्प, आंबळे धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावून काम सुरु करणे. लावंघर उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देणे. वेणेखोल या पुनर्वसित गावठाणातील 80 खातेदारांना पर्यायी जमीनीऐवजी रोख रक्कम देणे. नियोजित बोंडारवाडी धरण संरेखेवर विंधन विवरे घेऊन प्रशासकीय मान्यता मिळणे. कुडाळी मध्यम प्रकल्पातील वहागाव, हातगेघर, महू, पानस, रांजणी, बेलोशी येथील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी रोख रक्कम मिळणे. हातगेघर ग्रामस्थांच्या नवीन उपसा सिंचन योजनेची मागणी, पानस येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन लाभ देणे आदी विषयांवर चर्चा झाली. हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी ना. शिवेंद्रराजे यांनी ना. विखे पाटील यांच्याकडे केली आहे. हे प्रश्न सोडवण्याबाबत ना. विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.