Robbery Gang Arrested | लूटमार करणारी परप्रांतीय टोळी गजाआड File Photo
सातारा

Robbery Gang Arrested | लूटमार करणारी परप्रांतीय टोळी गजाआड

एलसीबी व भुईंज पोलिसांची संयुक्त कामगिरी : 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर आठ दिवसांपूर्वी भुईंज परिसरात कार अडवून 20 लाखांची रक्कम चोरी केल्याप्रकरणी भुईंज पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांनी संयुक्तपणे कारवाई करून केरळमधील सात जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 20 लाख रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली वाहने, असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विनीथ ऊर्फ राजन राधाकृष्ण (वय 30, रा. ओलीओपारा, नालेपल्ली जि. पलक्कड), नंदकुमार नारायण स्वामी (32, रा. चिथिरा हाऊस, जयराम कॉलनी चिराक्कड), अजिथ कुमार (27, रा. कांजीकुलम हाऊस, जि. पलक्कड), सुरेश केसावन (47, रा. परिणाम कुर्सी, जि. पलक्कड), विष्णू क्रिशनकुटी (29, रा. उषा निवास, सूर्यकॉलनी कारेकटू परांबू, जि. पलक्कड), जिनू राघवन (31, रा. कांजिराकडवू, जि. पलक्कड), कलाधरण श्रीधरण (33, रा. चिनी कुलांबु, जि. पलक्कड) अशा सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर सहा संशयित अद्याप पसार आहेत.

आठ दिवसांपूर्वी पुणे-बंगळूर महामार्गावर मध्यरात्री पावणेतीनच्या दरम्यान संशयितांनी स्कॉर्पिओ, स्विफ्ट कारचा वापर करून एका हुंडाई गाडीला अडवून त्या गाडीची तोडफोड केली. कामोठे मुंबई येथून विटा (जि. सांगली) येथे कारमधून निघालेल्या सोने-चांदीच्या व्यापार्‍याला चोरट्यांनी मारहाण करत 20 लाखांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली होती. गाडीतील चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील 20 लाख रुपये रोकड पळवली.

चालकाला सर्जापूर फाटा ता. जावली येथे सोडून त्यांनी पलायन केले. याप्रकरणी विशाल हासबे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सुचनेप्रमाणे भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी संयुक्त तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस ठाण्याचे पतंग पाटील यांच्या दोन पथकाने सांगली, कोल्हापूर येथे नाकाबंदी करत या टोळीचा तपास केला. गुन्हा केलेली इनोवा, स्कार्पिओ, स्विफ्ट ही वाहने विटा तासगाव या रस्त्याने सांगली जिल्ह्यात गेल्याचे तपासात समोर आले.

सांगली पोलिसांच्या सहकार्याने भुईंज पोलिसांनी योगेवाडी ता. तासगाव येथे गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीथ ऊर्फ राजन याला अटक केली. त्यानंतर दोन्ही पथके केरळ राज्याकडे रवाना झाली. तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास या माध्यमातून केरळ पोलिसांच्या सहकार्याने इतर सहा जणांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडील 20 लाख रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीवर केरळ, मध्यप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांमध्ये दरोडा, जबरी, चोरी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या तपासामध्ये आतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, अरुण पाटील, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, प्रवीण पवार, भुईंज पोलीस ठाण्याचे वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, अमोल सपकाळ, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, कराड शहर पोलीस ठाण्याचे अमलदार हिरामण बामणे, प्रफुल्ल गाडे यांनी सहभाग घेतला होता.

पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद...

भुईंज पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौतुकास्पद कारवाई केली आहे. रक्कम लंपास झाल्यानंतर काही तासातच यातील एक संशयित पकडण्यात आला. त्यानंतर एका स्कार्पिओवरून या दोन्ही टीमने तपासाची चक्रे हलवली. आठ दिवसांत सांगली, कोल्हापूर व केरळ असा तपास करत संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT