वेलंग : वाईच्या राजकारणात तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही नेहमीच प्रभावी राहिली आहे. मात्र, यावेळी या आघाडीच्या सूत्रधारांनी डॉ. नितीन कदम यांना उमेदवारी देताना जमिनीवरील वास्तव दुर्लक्षित केले. ‘याला गाड त्याला गाड’ या अंतर्गत कार्यकर्त्यांच्या कुरघोड्यांनी ना. मकरंद पाटील यांच्या विश्वासाला तडा दिला. ना. पाटील यांच्या बालेकिल्ल्याला घरभेद्यांनीच सुरूंग लावल्याचे पालिका निवडणुकीत दिसून आले. नितीन कदम हे वाईकरांवर लादलेले उमेदवार अशी प्रतिमा भाजपने तयार केल्यानेच अनिल सावंत यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी व अनिल सावंत यांचा दांडगा जनसंपर्क यामुळे भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला नामोहरम केले.
अनिल सावंत यांच्या विजयामागे भाजपची सूक्ष्म रणनीती होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जेव्हा अंतर्गत वादात गुंतले होते, तेव्हा भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक प्रभागात जाऊन डॉ. कदम यांच्या विरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र केला. अनिल सावंत आणि प्रा. नितीन कदम यांच्यात कार्यकर्ता विरुद्ध आयात असे निवडणुकीला स्वरूप आले. याचा फायदाच सावंत यांना झाला. डॉ. कदम यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांची छुप्या पद्धतीने झालेली बंडाळी. पक्षाचे काही पदाधिकारी व्यासपीठावर डॉ. कदमांच्या सोबत होते, पण प्रत्यक्षात त्यांची रसद भाजपबरोबर होती. 2160 मतांचा मोठा फरक हा स्पष्ट करतो की रााष्ट्रवादीच्या हक्काच्या मतपेटीला खिंडार पडले आहे आणि ते घरच्यांनीच घरभेदी कार्यकर्त्यांनी पाडले आहे. नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार पडतो यातच राष्ट्रवादीतील बंडाळी स्पष्टपणे दिसते.
डॉ. नितीन कदम यांना उमेदवारी देताना आघाडीच्या प्रमुखांनी त्यांना विजयाची खात्री दिली होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. कदमांना रसद आणि कार्यकर्त्यांची साथ पुरवताना प्रमुखांनी आखडता हात घेतल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी देण्यात फसगत झाली हा आरोप आहे की डॉ. कदमांना बळीचा बकरा बनवून स्वतःची राजकीय सोय लावून घेतली गेली का? याची चर्चा रंगली आहे. डॉ. नितीन कदम यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय खच्चीकरण स्वकीयांनी केल्याचे निवडणुकीत दिसून आले.
राज्यात अजित पवार यांची ताकद मोठी असली तरी वाईमध्ये त्यांच्या नावाचा करिष्मा चालू दिला नाही. आबांच्या पुढे मी मोठा का तू मोठा या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचा करिष्मा फिका पडला. मतदारांनी केवळ पक्षाचा चेहरा न पाहता उमेदवारांची स्थानिक पकड आणि त्याला मिळणारा कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहिला अन् इथेच डॉ. कदम कमी पडले. या पराभवामुळे वाईच्या राजकारणात रााष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या वर्चस्वाला मोठा तडा गेला आहे. अनिल सावंत यांचा विजय हा केवळ भाजपचा विजय नसून तो तीर्थक्षेत्र आघाडीच्या मनमानी कारभारावर मतदारांनी ओढलेला ताशेरा आहे. तसेच रााष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरातील प्रमुखांना आत्मचिंतन करणारा हा विजय आहे.
वाई हा मंत्री मकरंद पाटील यांचा अभेद्य बालेकिल्ला समजला जातो. मात्र, या निवडणुकीत रााष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे 12 नगरसेवक निवडून येऊनही, मुख्य नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हारणे याबाबत ना. मकरंदआबांना झाडाझडती घ्यावी लागणार आहे. मकरंद पाटील एकाकी खिंड लढवत होते आणि दुसरीकडे भाजपने मंत्र्यांची वाई शहरात फौज उतरवली होती, हे नियोजन रााष्ट्रवादीला भारी पडले. ना. जयकुमार गोरेंना हलक्यात घेवू नका, असे मकरंदआबांना काही मित्रांनी सांगितले होते. मात्र, त्यांनीही गोरेंना हलक्यात घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. अनिल सावंत यांनी केवळ भाजपच्या लाटेवर अवलंबून न राहता, तीर्थक्षेत्र आघाडीच्या गेल्या अनेक वर्षांच्या कारभारातील उणिवा शोधून काढल्या. त्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधला आणि आपण प्रस्थापितांच्या विरोधात उभा असलेला सर्वसामान्यांचा चेहरा आहोत, हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले. 2160 मतांचे अंतर हे दर्शवते की, मतदारांनी केवळ रााष्ट्रवादीला नाकारले नाही तर अनिल सावंतांना स्वीकारले.
डॉ. नितीन कदम यांच्या पराभवात बाहेरच्यांपेक्षा घरभेद्यांनी मोठी भूमिका बजावल्याचे मतपेटीतून स्पष्ट दिसत आहे. रााष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या प्रभागात देखील भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्य मिळाले. यावरून कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे काम केलं हेही नेत्यांनी पाहणे तितकेच गरजेचं आहे. राष्ट्र्रवादीचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि प्रस्थापित कार्यकर्ते डॉ. कदम यांच्या उमेदवारीने नाराज होते. हे नेत्यांनी कधी तपासून पाहिले का? व प्रचारात अनेक जण केवळ फोटो काढण्यापुरते सोबत होते, पण प्रत्यक्षात आतल्या गटात त्यांनी भाजपच्या अनिल सावंतांना मदत केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, डॉ. नितीन कदम यांचा पराभव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पराभव नसून, तो तीर्थक्षेत्र आघाडीच्या अति-आत्मविश्वासाचा आणि अंतर्गत गटबाजीचा विजय आहे. जर रााष्ट्रवादीने वेळीच सावध होऊन कार्यकर्त्यांमधील बंडाळी व नाराजी दूर केली असती, तर हा बालेकिल्ला अभेद्य राहिला असता. या पालिका निवडणुकीचा बावधन व यशवंतनगर या दोन जिल्हा परिषद गटांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ना. मकरंद पाटील संघटन बांधण्यासाठी काय कारतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.