Iran Israel US conflict impact Pudhari File Photo
सातारा

Iran Israel US conflict impact: दुबईत अडकलेले 20 पर्यटक मायदेशी दाखल

साताऱ्यात 9 जण पोहोचले सुखरूप : अडकलेल्या 10 जणांसाठी प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

सातारा : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे भडकलेल्या युद्धात भारताचे 30 पर्यटक दुबईत अडकले होते. त्यापैकी 20 जण भारतात दाखल झाले असून 9 जण सातारा जिल्ह्यात आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत. 10 पर्यटक अद्याप दुबईत अडकले असून, ते सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील 30 पर्यटक दुबईत पर्यटन आणि वैयक्तिक कारणासाठी गेले होते. जिल्हा प्रशासनाने संबंधित नागरिकांची माहिती घेऊन जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्याने दिलासा मिळाला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पर्यटक तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे. दुबईमध्ये अडकलेल्या 30 पैकी 20 पर्यटकांना भारतात सुखरूप आणण्यात आले आहे. हे पर्यटक मुंबई, हैदराबाद तसेच बंगळूर येथील विमानतळावर उतरले आहेत.

9 पर्यटक सातारा जिल्ह्यात दाखल झाले असून घरी सुखरूप पोहोचले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. इतर राज्यातील विमानतळांवर उतरावे लागल्याने 11 पर्यटक मार्गस्थ होते. ते गुरूवारी रात्री किंवा शुक्रवारी आपापल्या घरी पोहोचतील असे सांगण्यात आले. विमान वाहतूक विस्कळीत असल्यामुळे दुबईत अद्याप 10 पर्यटक अडकले आहेत. मात्र, हे पर्यटक सुरक्षित असून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था हॉटेल व विमानतळावरच करण्यात आली आहे. लवकरच संबंधित पर्यटकांना मायदेशी आणण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

संबंधित पर्यटकांचे नातेवाईक राज्याच्या आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधू शकतात. परदेशात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सातारा जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाच्या (02162) 232175, 233833 किंवा मंत्रालयीन नियंत्रण कक्षाच्या 9321590561 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT