Satara Municipality Elections | मनोमिलनातील कुरघोड्यांमुळे सातार्‍यात अपक्षांना बळ Pudhari Photo
सातारा

Satara Municipality Elections | मनोमिलनातील कुरघोड्यांमुळे सातार्‍यात अपक्षांना बळ

राजेंना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिका निवडणुकीत अपक्ष मुसंडी मारणार, हा मतदानाच्या आधीच राजकीय वर्तुळात वर्तवला गेलेला अंदाज निकालाने खरा ठरवला. सातार्‍याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा मेसेजही त्यामुळे मिळाला. तब्बल नऊ अपक्षांनी विजय मिळवत पक्षचिन्हांपेक्षा व्यक्ती, स्थानिक नेतृत्व, गावकी-भावकी आणि केलेल्या कामाचा प्रभाव अधिक निर्णायक ठरतो, हे दाखवून दिले. या निवडणुकीत खा. छ. उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन दिसत असले तरी प्रत्यक्ष मैदानात कार्यकर्त्यांमधील संघर्ष, बंडखोरी आणि अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण उघडपणे समोर आले. त्याचा थेट फायदा अपक्षांना झाला तर अधिकृत उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला.

सातारा पालिकेच्या निवडणुकीत यावेळी दोन्ही राजेंचे मनोमिलन असतानाही अपक्षांनी जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे या निवडणुकीत काही निष्कर्ष दिसून आले. पक्षचिन्हापेक्षा व्यक्ती प्रभावी ठरली. मतदारांचा विश्वास, स्थानिक नेतृत्व, लोकसंपर्क, केलेली कामे याला मतदारांनी प्राधान्य दिले. दोन्ही राजेंचे मनोमिलन वरवरचे दिसले तरी गटांतर्गत राजकारण, तिकीट वाटपातील नाराजी आणि समन्वयाचा अभाव यामुळे रणांगणात पक्षीय गणित कोलमडले. सातारा पालिकेचा हा निकाल भविष्यातील निवडणुकांसाठी इशारा देणारा ठरू शकतो. आंधळा पाठिंबा नाही, काम कराल तरच मत मिळेल. मतदार आता आंधळी पक्षनिष्ठा स्वीकारत नाही, असा मेसेज मतदारांनी निवडून आलेल्या अपक्षांच्या संख्येवरून दिल्याचे स्पष्ट होते. काम, लोकसंपर्क आणि विश्वास या त्रिसूत्रीवर पुढील राजकारण उभे राहणार, हेच या निवडणुकीचे खरे राजकीय विश्लेषण ठरणार आहे. सातार्‍याच्या राजकारणात अपक्षांनी घेतलेल्या जागा पाहता भविष्यातील निवडणुकांसाठी पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा ठरणार आहे.

गावकी भावकीच्या राजकारणात तीन मतांचा निकाल

सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मध्ये सर्वांत नाट्यमय निकाल लागला. उदयनराजे गटाचे अपक्ष उमेदवार शंकर किर्दत यांनी अवघ्या तीन मतांनी ना. शिवेंद्रराजे गटाचे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार प्रतिक मोहिते यांचा पराभव केला. येथे पक्षीय समीकरणांपेक्षा गावकी-भावकीच्या राजकारणामुळे मतदारांचे ध्रुवीकरण झाले. या ध्रुवीकरणाचा फटका मोहिते यांना बसला. पक्षाचा झेंडा पुरेसा नाही, तर स्थानिक नाळ महत्त्वाची आहे, असा मतदारांचा सूचक इशारा देणारा हा निकाल ठरला.

सदरबझारमध्ये आयात उमेदवार विरूद्ध स्थानिक उमेदवार

प्रभाग क्र. 3 मध्ये अपक्ष उमेदवार गुरूदेव ऊर्फ मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांच्या विजयामागे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुशिल मोझर यांची भूमिका निर्णायक ठरली. हद्दवाढ भागातील खेड व पिरवाडी परिसरात मोझर यांचे पूर्वीपासून वर्चस्व आहे. त्याचवेळी प्रभागात आयात उमेदवार दिला, हा प्रचार प्रभावी ठरला. परिणामी भाजपच्या अधिकृत उमेदवार रेणू येळगावकर यांना पराभव स्वीकारावा लागला. याच प्रभागात शिवेंद्रराजेंचे समर्थक चेतन सोळंकी यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली. मात्र सदरबझारमधील भारतमाता मंडळातील अंतर्गत गटबाजीचा सोळंकी यांना फटका बसला. पक्षाचे आणि विरोधी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि अपक्ष यांनाच प्रामुख्याने मतदान झाल्याने दोन्ही अधिकृत उमेदवार पराभूत झाले आणि अपक्षांना लॉटरी लागली.

मल्हारपेठेत मतविभागणीमुळे अपक्षांना फायदा

प्रभाग क्र. 13 मध्ये अपक्ष उमेदवार सावित्री बडेकर यांनी बाजी मारली. बडेकर यापूर्वी खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीतून निवडून आल्या होत्या. बडेकर यांना निवडून आणण्यात त्यांचे पती माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांची महत्त्वाची भूमिका ठरली. तिकीट वाटपात अन्याय झाल्याची सल विजय बडेकर यांनी मनात ठेवून सावित्री बडेकर यांना निवडून आणले. मात्र याच प्रभागात उदयनराजे गटाच्या व भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहल तपासे यांना मतविभाजनामुळे पराभवाचा धक्का बसला. तपासे यांना ज्यांनी उमेदवारीसाठी भरीस घातले त्यांनी त्यांचा प्रचार केला का? एकाच गटातील अनेक चेहरे निवडणुकीत उभे राहिल्याने अधिकृत उमेदवार अडचणीत येतो हे या निकालातून स्पष्ट होते.

प्रभाग क्र. 14 मध्ये क्रॉस व्होटिंग निर्णायक ठरले. खा. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीतून माजी उपनगराध्यक्षा झालेल्या अपक्ष उमेदवार दिनाज शेख यांनी खा. उदयनराजे गटाच्या व भाजपच्या अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके यांचा पराभव केला. या प्रभागात क्रॉस व्होटिंग निर्णायक ठरले. मतविभाजनामुळे दिनाज शेख यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. दिनाज शेख यांना त्यांचे पती माजी नगराध्यक्ष नासीर शेख यांची खूप मदत झाली.

गोडोलीत नाराज मोरे भावकीचा मतपेटीतून पुन्हा मेसेज

प्रभाग क्र. 18 मध्ये मोरे भावकी एकवटल्याने अपक्ष विनोद मोरे-पाटील विजयी झाले. ते उदयनराजे गटाशी संबंधित असले तरी अपक्ष म्हणूनही त्यांना मतदारांनी पसंती दिली. या प्रभागात ना. शिवेंद्रराजे गटाचे व भाजपचे अधिकृत उमेदवार शेखर मोरे-पाटील यांनी प्रभागात विकासकामे करूनही केवळ भावकीने साथ सोडल्याने हार पत्करावी लागली. या प्रभागात ना. शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेखर मोरे-पाटील यांच्या विरोधात उघड उघड काम केले. शेखर मोरे-पाटील यांच्यासाठी फार प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे अडचणी वाढल्या आणि अपक्ष उमेदवार विनोद मोरे यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT