लखनौ; वृत्तसंस्था : तापाने फणफणलेला असतानाही के. एल. राहुलने आपले सर्वस्व पणास लावत नाबाद 176 धावांची मास्टरक्लास खेळी साकारल्यानंतर त्याला साई सुदर्शनसह अन्य फलंदाजांचीही समयोचित साथ लाभली आणि या जोरावर भारत ‘अ’ संघाने येथील दुसर्या अनधिकृत कसोटीत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला चारीमुंड्या चीत केले. भारत ‘अ’ संघाने यासह 2 सामन्यांची ही कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.
वास्तविक, या लढतीतील चौथ्या डावात 412 धावांचे कडवे आव्हान भारतासमोर होते; पण 2 बाद 169 या मागील धावसंख्येवरून डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर के. एल. राहुल व साई सुदर्शन यांची झंझावाती शतके निर्णायक ठरली. के. एल. राहुलने 210 चेंडूंत नाबाद 176 धावा फटकावल्या. त्याच्या या मास्टरक्लास शतकी खेळीत 16 चौकार व 4 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. याशिवाय, साई सुदर्शनने 172 चेंडूंत 9 चौकार व एका षटकारासह 100 धावा फटकावल्या. शतक झळकावल्यानंतर तो लागलीच बाद झाला. मात्र, तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.
देशाच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातील ही सहावी सर्वात मोठी यशस्वी धावसंख्या ठरली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात मोठा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम अजूनही पश्चिम विभागाच्या नावावर आहे. या संघाने जेव्हा त्यांनी 2010 च्या दुलिप ट्रॉफी फायनलमध्ये दक्षिण विभागाने दिलेले 536 धावांचे लक्ष्य पार केले होते.
शुक्रवारी चौथ्या आणि अंतिम दिवसाची सुरुवात 2 बाद 169 धावांवरून करताना, भारत ‘अ’ ने 189 धावांच्या एकूण धावसंख्येवर मानव सुतारची विकेट गमावली. परंतु, सुदर्शन (172 चेंडूंत 100 धावा) आणि कर्णधार ध्रुव ज्युरेल (56) यांनी चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी करत 412 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कायम ठेवला. सुदर्शनने 170 चेंडूंमध्ये आपले आठवे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मायदेशातील कसोटी मालिकेसाठी त्याची निवड सार्थ ठरवणारा हा अप्रतिम डाव होता.
शतक पूर्ण केल्यानंतर अवघ्या दोन चेंडूंनंतर ऑस्ट्रेलियाचा ऑफ-स्पिनर कोरी रॉकीचिओलीने 23 वर्षीय सुदर्शनला बाद केले. त्यानंतर राहुल आणि ज्युरेल मैदानात एकत्र आले. या उभयतानी पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करताना राहुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी 74 धावांवर निवृत्त झालेल्या राहुलने 136 चेंडूंमध्ये आपले 22 वे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले आणि त्यानंतरच्या 76 धावा त्याने केवळ 74 चेंडूंमध्ये फटकावल्या. यामुळे भारत ‘अ’ ने लक्ष्याच्या दिशेने आगेकूच केली.
अलीकडेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या ‘अँडरसन-तेंडुलकर करंडक’ पाच सामन्यांच्या मालिकेत राहुलने 53.20 च्या सरासरीने दोन शतकांसह 532 धावा केल्या होत्या. राहुलने तोच उत्कृष्ट फॉर्म येथे कायम ठेवला. ज्युरेल 382 धावांवर बाद झाला. परंतु, तोपर्यंत यजमान संघाने शानदार विजय द़ृष्टिपथात आणला होता. राहुल आणि नितीशकुमार रेड्डी (16 नाबाद) यांनी चहापानाच्या काही मिनिटे आधी हा ऐतिहासिक विजय पूर्ण केला.
भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ या दोन संघांत अनधिकृत कसोटी मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वन-डे मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिली वन-डे मंगळवार, दि. 30 रोजी कानपूर येथे खेळवली जाईल.
के. एल. राहुलला यापूर्वी गुरुवारी सामन्याच्या तिसर्या दिवशी दुखापतीमुळे 74 धावांवर निवृत्त व्हावे लागले होते. मात्र, शुक्रवारी चौथ्या व शेवटच्या दिवशी नाईट वॉचमन मानव सुतार बाद झाल्यानंतर के. एल. राहुल मैदानात परतला आणि त्याने नाबाद राहत विजयावर शिक्कामोर्तब क रत आपल्या दुर्दम्य जिद्दीची प्रचिती दिली. आपण मैदानात परतलो, ते विजयाच्या निर्धारानेच, हेच जणू त्याने अधोरेखित करून दाखवले.