सातारा : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची मागणी आहे. दुसर्याचं ओरबाडून खाणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ओबीसींचा कोटा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देता येईल. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. सरकारने वेळकाढूपणा न करता मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय लवकर जाहीर करावा, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आ. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी मनोज जरांगे यांची मुंबईत उपोषणस्थळी भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे लढा देत आहेत. हे आंदोलन चिघळण्याआधीच सरकारने बैठक घेत त्यात विरोधकांनाही सहभागी करून घ्यावे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे यांची होती. सरकारने नेमलेल्या समितीने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्टीकरण केले आहे. त्यानंतरही ‘सरसकट’ शब्द काढून ओबीसी आरक्षणाचा जीआर काढावा, अशी जरांगे यांची मागणी आहे.
ओबीसीतून आरक्षण द्यायचं म्हटलं तर आरक्षणाचा कोटा हाच या निर्णय घेण्यातला मोठा अडथळा आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली तर ओबीसींचा कोटा वाढवता येतो. केंद्रात आणि राज्यात बहुमताचे सरकार आहे. अशावेळी राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी ठरवले तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येईल. या संदर्भात केंद्राने कायदा करणे गरजेचे आह,. असे मत आ. शिंदे यांनी व्यक्त केले.