खटाव : माण तालुक्याच्या उत्तर आणि पश्चिम भागातील वंचित गावांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्व गावांचा गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी मान्यता देण्यात आल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आणून जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ऐन दुष्काळात याच पाण्यामुळे टँकर भरता आले होते. नुकतेच हे पाणी आंधळी धरणातून माणगंगा नदीत सोडून कोल्हापूरी बंधारे भरण्यात आले आहेत. उत्तर माणमधील वंचित 32 गावांसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने वाढीव आंधळी उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली होती. त्या योजनेचे काम विक्रमी वेळेत पूर्णत्वाला गेले आहे.
जिहे-कठापूर योजनेच्या पाण्यापासून उत्तर आणि पश्चिम माणमधील आणखी काही गावे वंचित रहात होती. या गावांचा समावेश लाभक्षेत्रात करण्यासाठी प्रयत्न केले होते. या गावांचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी फेर जलनियोजनातून या गावांसाठी सव्वा टीएमसी पाणीही उपलब्ध करुन दिले. गुरुवारी मंत्रीमंडळ बैठकीत या गावांचा समावेश जिहे-कठापूर योजनेच्या लाभक्षेत्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान होत असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ बैठकीत खुटबाव, कारखेल, शिखर शिंगणापूर, वावरहिरे, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोगराळे, बिजवडी, पांगारी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनपूर, थदाळे, शंभूखेड, हवालदारवाडी, मोही, इंजबाव, दानवलेवाडी, येळेवाडी, परकंदी, पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी, महिमानगड, उकिर्डे, पिंगळी बुद्रूक , सत्रेवाडी, मलवडी, आंधळी, स्वरुपखानवाडी, शिरवली, कुळकजाई, बोथे, भांडवली आणि शिंदी खुर्द या गावांचा लाभक्षेत्रात समावेश करण्यात आल्याचेही आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.