सातारा; पुढारी वृत्तसेवा : 'आपले गुरूजी' या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आदेश दिले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 468 प्राथमिक शाळांत गुरूजींचे फोटो झळकले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना या आदेशाची अमंलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वत: उपस्थित न राहता इतर कोणालाही पाठवायचे अशी प्रकरणे वाढत आहेत. याबाबत शासनाकडे तक्रारीही आल्या होत्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश बजावले होते. सरकारी शाळांमधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम दुसर्याचे असे करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक शाळेकडे फिरकत नसल्याचे आढळले. काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करुन सरकारकडून मात्र चांगला पगार घेणार्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे या शिक्षकांना शिस्त लागण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने आपले गुरूजी अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे आपल्यासाठी शासनाने कोणते शिक्षक नियुक्त केलेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांनासुध्दा चाप लागला आहे.
सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये या निर्णयाची अमंलबजावणी करून शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्यात आली याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागवली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे 468 गुरूजींची छायाचित्रे वर्गात झळकू लागली आहेत. मात्र, आपले गुरूजी या उपक्रमात शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात आले नसल्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या काही तालुक्यांतील प्राथमिक शाळांत आपले गुरूजी या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे; मात्र ज्या शाळेत अद्यापही शिक्षकांची छायाचित्रे लावण्यात आली नाहीत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)