सातारा : प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नये. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे, असे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगत आहे, असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी दिला.
दरम्यान, ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकर बोलत होत्या. मराठी साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनतर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी अध्यक्षपदाच्या वर्षभरातील कार्याचा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विश्वास पाटील यांच्याकडे 99 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली.
माझ्या जडणघडणीत ग्रंथालयांचा मोठा सहभाग आहे, असे सांगून डॉ. तारा भवाळकर पुढे म्हणाल्या, मराठी भाषा देश, धर्म, जात याच्या पलीकडेच नव्हे तर ती महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचली आहे. मराठी माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने मराठीची रुजवण केली, याची दखल आपण घेणार आहोत की नाही? मी प्रमाणभाषा, शुद्ध, अशुद्ध, मंगल, अमंगल भाषा असे भेद मानत नाही. जुने असते ते सगळेच सोने असते किंवा नवे सगळेच टाकाऊ असते, असे माझे मत नाही. सत्व ओळखणाऱ्या जाणकारांना या गोष्टी पटू शकतात.
आयुष्याच्या उत्तरायणाच्या काळात मला 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा अपघात होता. तो सन्मान महामंडळाने दिला. 99 व्या संमेलनाच्या अध्यक्षांची कारकीर्द आता सुरू होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा आनंद झाला. पण आता प्रश्न आहे की, आपण मराठी भाषा साहित्य निर्मितीसाठी पायाभूत असे काही करणार आहोत की नाही?
98 व्या संमेलनात केलेल्या भाषणाविषयी त्या म्हणाल्या, ते भाषण फार गाजले. सर्वस्तरातील लोकांना ते आवडले. कारण माझ्या मते संस्कृती ही नेहमी समूहाची असते. समूहातील प्रत्येक व्यक्ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या भाषणातील विचार त्यांना आवडले कारण ते विचार त्यांचेही होते. मी फक्त त्यांच्या भावना अभिव्यक्त केल्या. त्यामुळे मी समूह मनाचा आवाज झाले.