चाफळ : चाफळ परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून वनविभाग मात्र शांत भूमिका घेत असल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. उत्तरमांड धरणातील पाणी कमी झाल्यानंतर उघड्या पडलेल्या परिसरात वनविभागाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता काही व्यापाऱ्यांकडून निरगेल, आंबा, करवंद, जांभूळ तसेच इतर मौल्यवान झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे तोडण्यात आलेली झाडे कडववाडी येथील मुख्य रस्त्यावरच मोठमोठ्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात टाकून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालक, दुचाकीस्वार आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या लाकडांच्या ढिगांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
चाफळ, केळोली, वीरेवाडी, चव्हाणवाडी, दाढोली, माजगाव, जाळगेवाडी, जाधववाडी, वाघजाईवाडी तसेच पाडळोशी परिसरातील डोंगरमाथे आणि शेतालगतची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. चाफळ-पाटण-पाडळोशी-केळोली रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे उभी असलेली हिरवीगार झाडे रातोरात जमीनदोस्त केली जात आहेत. दरम्यान, रस्त्यावर टाकून ठेवलेल्या लाकडांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
वन्यजीवांचा अधिवास धोक्यात
गेल्या काही महिन्यांपासून डोंगर परिसरातील झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. पक्षी, ससे, मोर आणि इतर प्राणी मानवी वस्तीकडे वळू लागले असून जैवविविधतेवर मोठा परिणाम होत आहे. पावसाळ्यापूर्वीच डोंगर उघडे पडल्याने भविष्यात मृदस्खलन, दरडी कोसळणे, भूजलपातळी घटणे आणि पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.