कोरेगाव : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील अवैध व धोकादायक स्पीड ब्रेकरमुळे गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे यांनी केली आहे. हा अपघात नसून व्यवस्थेने केलेला खून आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सातारा-रहिमतपूर रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, प्रिती हॉटेल ते रहिमतपूर या मार्गावर तब्बल 48 स्पीड ब्रेकर उभारण्यात आले असून ते प्रमाणापेक्षा उंच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी नवविवाहित दाम्पत्य दुचाकीवरून रात्री प्रवास करत असताना या मार्गावरील उंच स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने गर्भवती महिला खाली पडून जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या रमेश उबाळे यांनी घटनास्थळाची पाहणी करत स्पीड ब्रेकरच्या कामातील त्रुटींवर जोरदार टीका केली. स्पीड ब्रेकर करताना आवश्यक सुरक्षा निकष पाळले गेले नाहीत. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उबाळे यांनी दिला.