मारूल हवेली : पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर माती उत्खनन सुरू असल्याची चर्चा असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला याची माहिती मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मातीमाफियांना पाठीशी घालणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्यात वीटभट्ट्या, विविध रस्ते प्रकल्प तसेच भरावाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात मातीची मागणी आहे. या मागणीचा फायदा घेत अनेक ठिकाणी शासनाची आवश्यक परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू असल्याचे बोलले जात आहे. कोयना नदीकाठच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असून, उत्खनन केलेल्या मातीची खुलेआम विक्री केली जात असल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील अनेक भागांमध्ये जेसीबी व पोकलेन मशिनच्या सहाय्याने दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन होत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे संबंधित विभागाकडून कारवाई अथवा नोटिसा देण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे.
काही ठिकाणी दिवसाढवळ्या उत्खनन सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. तर काही प्रकरणांमध्ये अल्प प्रमाणात रॉयल्टी भरून त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात उत्खनन केले जात दिसून येते. लाल मातीने भरलेले डंपर दिवसभर रस्त्यांवरून धावताना दिसतात. काही भागांत रात्री उशिरा व पहाटेच्या सुमारासही अशा वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नुकतेच मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या लाल मातीची वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीच्या प्रकारांना दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी व्यापक मोहीम राबवून बेकायदेशीर माती उत्खननावर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.