फलटण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी फलटण येथील डॉ. योगेश नरुटे आणि बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील पिंटू धुमाळ यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी डॉ. नरुटे यांच्या फलटण येथील रुग्णालयाची झाडाझडती घेण्यात आली असून तपासात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती तालुक्यातील एका 13 वर्षीय मुलीवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यावर तिला उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र कायद्याने आवश्यक असलेल्या वैद्यकीय व शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता तसेच बालसंरक्षण नियमांचे उल्लंघन करून गर्भपात करण्यात आल्याचे उघड झाले.
दरम्यान, अत्याचार प्रकरणातील एक संशयित पोलिस कोठडीत असताना आत्महत्या केल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. लैंगिक अत्याचारासोबतच वैद्यकीय नियमांचे उल्लंघन करुन गर्भपात केल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर व त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून सपोनि नागनाथ पाटील तपास करत आहेत. मुख्य आरोपी कोण, अत्याचार कोणी केला, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याचा तपास सुरू आहे.
गर्भपातासाठी मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित रुग्णालयाची झाडाझडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे समजते. या धाग्यांच्या आधारे अशा प्रकारचे आणखी बेकायदेशीर गर्भपात झाले आहेत का?, तसेच या प्रकरणामागे साखळी आहे का?, याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.