उपमुख्यमंत्री अजित पवार  File Photo
सातारा

चौकशीचा धाक दाखवाल तर खपवून घेणार नाही : अजित पवार

पुढारी वृत्तसेवा

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणे, भीती दाखविणे तसेच कार्यकर्ते फोडून भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून घेणे असा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्यानंतर फलटण येथील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना ना. अजित पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवाल, धाक दाखवाल तर खपवून घेणार नाही. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण चर्चा करू. कार्यकर्त्यांना एकटे पडू देणार नाही. कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे आणि हा दादाचा वादा असल्याचा शब्द अजितदादांनी दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सोमवारी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने फलटण येथे आले होते. मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर आ. दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून भाजपच्या नेते मंडळीकडून कार्यकर्त्यांना होणार्‍या त्रासाची माहिती देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याकडून व वरिष्ठांकडून आम्हाला सातत्याने धमक्या येत असून पक्ष बदल करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसेच काही अधिकारी व पोलीस सुद्धा आम्हाला धमकावत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ना. अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष चालत असतो. जर कार्यकर्तेच अडचणीत असतील तर पक्षाचा काय उपयोग याची आम्हाला जाणीव असून सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत. कार्यकर्त्यांना ज्या धमक्या येत आहेत त्याची आपण गांभीर्याने दखल घेतलेली आहे. महायुतीमध्ये आपण असलो तरी समन्वय राखून काम करण्याचे ठरलेले आहे. त्यामुळे एकमेकांच्या कार्यकर्त्यांचा आदर राखणे ही महायुतीमधील सर्वांची जबाबदारी आहे. येथे जो कार्यकर्त्यांना धमकवण्याचा आणि पक्षप्रवेश करून घेण्याचा प्रयत्न होत आहे त्याबाबत भाजपच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेते मंडळींशी आपण स्वतः चर्चा करणार आहोत व यापुढे असले प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाईल.

कोणता अधिकारी किंवा नेता जर तुम्हाला धमक्या देत असेल तर थेट माझ्याकडे या कोण काय करतोय हे बघू? कार्यकर्ता हा आमचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही देऊन हा दादाचा वादा असल्याचा शब्द सुध्दा अजितदादांनी दिला.

खा. सुनील तटकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणात कार्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आम्हाला आदर आहे कार्यकर्ता हा आमचा आत्मा आहे. त्याचा सन्मान जपणं हे महत्त्वाचे आहे.या बाबतीत निश्चितच राज्य केंद्रीय पातळीवरील भाजप नेत्यांची चर्चा केली जाईल. आम्हाला गरज होती आणि सत्ता पाहिजे होती म्हणून आम्ही महायुतीत सहभागी झालेलो नाही तर जनतेच्या विकासासाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो असून एक विचाराने सरकार अतिशय वेगाने काम करत आहे.मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. तिन्ही पक्षात समन्वय राखण्याच्या दृष्टीने या पुढे प्राधान्य दिले जाईल, असे खा. तटकरे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT